प्रतिक राठोड, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. या पुराच्या पाण्यात दारव्हा तालुक्यातील दहेली येथे एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दहेलीजवळ अडाण नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक इर्टिगा कार थेट पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. या भयानक दुर्घटनेत कार चालक झाडाचा आधार मिळाल्याने सुखरूप वाचले. परंतु दुर्दैवाने त्यांची पत्नी आणि दोन लहान मुली पाण्याच्या तीव्र प्रवाहात कारसह वाहून गेल्या आहेत. या घटनेमुळे दारव्हा आणि आर्णी तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाण्याचा अंदाज चुकला अन् क्षणार्धात घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश नामदेव खंडारे हे आपल्या कुटुंबासह इर्टिगा कारने लोणीच्या दिशेने परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील मौजा दहेली येथील अडाण नदीच्या पुलावर आले असता, पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. अविनाश खंडारे यांचा पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला आणि त्यांनी कार पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कार क्षणात महापुरात वाहून गेली.
(नक्की वाचा- Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)
काल चालक झाडावर चढून बचावले
कार वाहून जात असताना अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखून कारमधून बाहेर पडत जवळच असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला. ते रात्रभर झाडावर अडकलेल्या अवस्थेत होते, ज्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. कारमध्ये असलेल्या त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि दोन लहान मुली पुराच्या पाण्यात कारसह वाहून गेल्या. त्यांचा रात्रीपासून सातत्याने शोध घेतला जात आहे.
(नक्की वाचा- Rain News: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्याना 'रेड अलर्ट'; दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर)
पालकमंत्री संजय राठोड सक्रिय
या दुर्घटनेची बातमी मध्यरात्री सुमारे 3 वाजता मिळताच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.
सध्या घटनास्थळी अडाण नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थ युद्धपातळीवर बेपत्ता माय-लेकींचा शोध घेत आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आणि पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world