प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना सावध करणारी एक बातमी आहे. निवडणूक काळात ईव्हीएम मशीन हॅक केले जात असल्याचे आरोप आजवर आपण ऐकले असतील. मात्र नाशिकमध्ये याच ईव्हीएमच्या नावाखाली ठाकरे गटाच्या उमेदवाराला धमकावण्याचा आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पैसे न दिल्यास ईव्हीएम हॅक करून तुमचा पराभव केला जाईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी सतत नवीन शक्कल लढवत असतात. नाशिकमधील या आरोपीनं फसवणुकीसाठी चक्क ईव्हीएमची भीती दाखवलीय. नाशिक मध्य मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांचे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम पाहणाऱ्या आनंद शिरसाठ यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यलयात आलेल्या व्यक्तीनं स्वत:चं नाव भगवानसिंह चव्हाण आहे, असं सांगितलं. आपण निवडणूक प्रचाराचं काम करतो, वसंत गीतेंना विजयी करण्यासाठी ईव्हीएम हॅक करुन देऊ, असा दावा चव्हाण यांनी केला. त्यानंतर शिरसाठ यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
ईव्हीएम हॅक करून 10 मतदानापैकी 3 ते 4 मतं आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आणि निवडणुकीत जिंकून देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले. या कामासाठी आमच्याकडं 42 लाखांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत तर ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग करत तुमचा पराभव करु असंही त्यांनी धमकावलं, अशी माहिती या प्रकरणाचे तक्रारदार असलेल्या शिरसाट यांनी दिली.
( नक्की वाचा : 'तुमच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालं नाही आणि हे...', धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला )
हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत असल्यानं वसंत गितेंनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीन तासातच मखलाबाद परिसरात राहणाऱ्या भगवानसिंह चव्हाण या भामट्याला गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली असता ईव्हीएम कुठल्याही प्रकारे हॅक करण्याची त्याच्याकडे यंत्रणा नाही यासोबतच फक्त पैसे उकळण्याच्या दृष्टीने त्याने ही शक्कल लढवल्याची कबुली त्यानं दिली. भगवानसिंह राजस्थानचा रहिवासी असून नाशिक शहरात मार्बलचा व्यवसाय करण्यासाठी तो आला होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
विरोधकांवर आरोप
नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे वसंत गीते आणि महायुतीच्या भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे, या दोघांमधील राजकीय वैमनस्य हे खरंतर सर्वश्रुत आहे त्यामुळे हे सर्व षडयंत्र रचण्यामागे विरोधकांचा तर हात नाहीत ना अशी शंका गिते यांनी उपस्थित केलीय तर फरांदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world