Nashik MNS Protest: नाशिकमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असून एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केल्याची घटना समोर आली आहे. मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फिजिक्सवाला या कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधील शरणपूर रोड परिसरात फिजिक्सवाला हे प्रसिद्ध कोचिंग सेंटर आहे. या क्लासमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत. मात्र, या ठिकाणी शिकवणारे अनेक शिक्षक हे परराज्यातील असून त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भाषेवरून वारंवार खटके उडत होते.
काही विद्यार्थ्यांना हिंदी विषय समजण्यास अडचण येत होती, त्यातूनच वादाची ठिणगी पडली. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना चक्क हिंदीतच शिकावे लागेल, असे बजावत मराठी भाषेला गावठी म्हणून हिनवल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.
( नक्की वाचा : VIDEO: 'तुम घाटी लोग...' मुंबईतील बड्या बिल्डरला 'ते' शब्द भोवले; संतापलेल्या कार्यकर्त्यांचा ऑफिसमध्ये राडा )
मनसे पदाधिकाऱ्यांचा क्लासमध्ये राडा आणि मारहाण
मराठी भाषेचा अपमान होत असल्याची माहिती मिळताच मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, बाजीराव मते, नितीन धानापुणे, अक्षय कोंबडे आणि रोहित उगावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी थेट फिजिक्सवाला क्लास गाठला. तिथे त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत गोंधळ घातला. संबंधित पांडे नामक शिक्षकाला समोर आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे आणि मराठी बोलण्यास मज्जाव करणे यावरून वाद विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
( नक्की वाचा : मुलगी नागिन बनून गायब झाल्याची चर्चा, बेडवर सापडली 5 फुटी कात; अखेर 'त्या' VIDEO नं उडवला पोलिसांचाही थरकाप! )
सात दिवसांचा अल्टिमेटम आणि पोलिसांत गुन्हा
या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी क्लास व्यवस्थापनाला एक गंभीर इशाराही दिला आहे. क्लासमधील सर्व परप्रांतीय शिक्षकांचे येत्या 7 दिवसांत राजीनामे घ्यावेत आणि त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही मागणी पूर्ण झाली नाही, तर क्लासची तोडफोड करून पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. या प्रकारानंतर क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
MNS Slaps PhysicsWallah Staff Nashik "मराठीला गावठी बोलता?" नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका; ८ दिवसांचा अल्टिमेटम | News#ndtvmarathi #MNS #Nashik #MarathiPride #PhysicsWallah #RajThackeray #NashikNews #MarathiBhasha #MNSStyle #BreakingNews… pic.twitter.com/J32YLr42c1
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 11, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world