
स्वानंद पाटील, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्याकांडानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हे प्रकरण लावून धरलंय. या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आली आहे. कराडच्या अटकेचा मुद्दा धस यांनीच लावून धरला होता. त्यांनी गेल्या दोन महिन्यात कराडवर अनेक आरोप केले आहेत.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत असलेले भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत. धस आणि वाल्मिक कराड यांचे 20 वर्षांपासून संबंध आहेत, असा गंभीर आरोप आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. आजबे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धस आणि आजबे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमने-सामने होते. त्यामध्ये धस यांनी आजबेंचा पराभव केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले आजबे?
आष्टी मतदारसंघात गेल्या 2-3 महिन्यांपासून विकासकामं बंद आहेत. आज मी उपोषण करणार होतो. पण, आज जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ मागितला. ते (सुरेश धस) लोकांना आका म्हणतात. मग आम्ही त्यांना गडाफी म्हणायचं का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
लोकांना बोलताना आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे देखील बघितलं पाहिजे. सुरेश धस यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा सुप्रीम कोर्टात दाखल आहे. 'आका' म्हणून हिणवणाऱ्या आकाचे आणि ढसांचे किती लागेबांधे आहेत हे तपासले पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. वाल्मिक कराड यांनी विधानसभा निवडणुकीत धस यांचे काम केले होते. वाल्मिक कराडनं अनेक गावच्या सरपंचांना निवडणुकीत सुरेश धस यांचे काम करण्यासाठी फोन केले होते. सध्या मी हाणल्यासारखं करतो तू रडल्यासारखे कर असा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
( नक्की वाचा : Dhas vs Awhad : सुरेश धस यांनी आव्हाडांचं केलं 'राष्ट्रीय संत' असं वर्णन, मानसिकतेवर विचारला प्रश्न )
सुरेश धस यांच्या विरोधातील 15 प्रकरणं आपल्याकडं असून दोन दिवसांनी त्याबाबत बोलणार आहे, असं आजबे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर आष्टी मतदार संघात खुणाचे काही प्रकार झाले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणाबाबत अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आम्हीही महायुतीमध्ये आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही आजबे यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world