
बहुचर्चीत मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज म्हणजेच गुरूवारी 31 जुलैला सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह कर्नल पुरोहीत यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला होता. रमजानचा महिना सुरू होता. त्याचवेळी मालेगावातल्या एका मशिदीजवळ मोटरसायकलवर भीषण स्फोट झाला. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 101 जण जखमी झाले होते.
बॉम्बस्फोट एवढा जबरदस्त होता की आजूबाजूची घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं होतं. पुढच्या महिन्यात ऑक्टोबर 2008 मध्ये या मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास सुरू झाला. तपासात अभिनव भारत संस्थेचं नाव समोर आलं. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहितांसारख्या 12 हायप्रोफाईल आरोपींना अटक झाली. या बॉम्बस्फोट प्रकरणी सुरुवातीच्या तपासामध्ये मुस्लीम समाजाकडे संशयाची सुई होती. या बॉम्बस्फोटामागे बंदी असलेल्या सिमी संघटनेचा हात असू शकतो, अशी चर्चा होती.
मात्र या तपासावेळी सापडलेल्या मोटरसायकलनं तपासाची दिशा बदलली. एटीएसनं साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितना अटक केली. आणि इथेच जन्म झाला भगवा दहशतवाद शब्दाचा. समीर कुलकर्णी हा ही मालेगाव बॉम्बसोटातील आरोपी पैकी एक होता. त्याचं म्हणणं आहे की 2009 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून तपासाची दिशा बदलली गेली. सरकारच्या दबावात पुढे भवगा दहशतवाद ही संकल्पना मांडली गेली, असा आरोप त्याने केला आहे. मालेगावात जिथे स्फोट झाला, तिथून जवळच सिमीचं ऑफिस होतं. याच ऑफिसमध्ये बॉम्ब तयार करण्यात आले. हे बॉम्ब मोटरसायकलवरुन नेत असताना त्यांचा स्फोट झाला, असा साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वकिलाचा दावा होता.
2009 मध्ये NIA कडे मालेगाव स्फोटांचा तसाप सोपवण्यात आला. 2011 मध्ये स्फोटांप्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल झालं. 2016 मध्ये सबळ पुरावे नसल्याचं कारण देत NIA नं साध्वी प्रज्ञा आणि इतर 6 जणांविरोधात मोक्का हटवून नव्यानं आरोपपत्र दाखल केलं. कोर्टानं 12 पैकी 5 जणांना क्लीनचिट दिली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या सात जणांविरोधात खटला सुरू राहिला. या प्रकरणात आरोपी नंबर एक साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आहेत. तिच्यावर बॉम्बस्फोटामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप आहे.
स्फोटासाठी मोटरसायकल, हत्यारं उपलब्ध करुन दिली. ज्या मोटरसायकलवर स्फोट झाला, ती मोटरसायकलही साध्वी प्रज्ञासिंहच्या नावावर होती. तर आरोपी नंबर दोन हा लेफ्टनेंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आहे. तोच या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. त्यानेच अभिनव भारत संघटनेची निर्मिती केली. शिवाय स्फोटकं आणि हत्यारं ही पुरवली. पुढचा आरोपी हा रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय हा आहे. तो अभिनव भारतचा सदस्य होता. स्फोटांमध्ये सक्रिय सहभाग, वेगवेगळ्या बैठकीतही सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
नक्की वाचा - Akola News: 'NDA चं सरकार येवू देणार नाही', भाजपच्या जुन्या सहकाऱ्याने प्रतिज्ञाच केली
पुढचा आरोपी अजय राहिरकर आहे. त्याने स्फोटासाठी पैसे गोळा केले असा आरोप आहे. सुधाकर द्विवेदी याच्यावर बॉम्बस्फोटांसाठी माथी भडकवण्याचं काम केलं, स्फोटांसंदर्भातल्या बैठकांना उपस्थिती असे आरोप आहेत. सुधाकर चतुर्वेदी हा या कटात सहभागी होता. समीर कुलकर्णी ही या स्फोटाच्या कटात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 2017 मध्ये हे सगळे आरोपी जामिनावर सुटले होते. विशेष कोर्टानं 2018 मध्ये सात आरोपींविरोधात यूएपीए आणि आईपीसीच्या आधारावर आरोप निश्चित केले. 2023 आणि 2024 मध्ये एटीएसनं दबाव टाकल्यानं अनेक साक्षीदारांनी साक्ष बदलल्याचा आरोप झाला.
NIA नं सगळ्या सात आरोपींना मृत्यूदंड देण्याची मागणी कोर्टाकडे केली. तब्बल 17 वर्षं मालेगाव बॉम्बस्फोटांचा हा खटला सुरू आहे. तिकडे या स्फोटातले पीडित आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत दहा वर्षांच्या फरहीनला गमावलेले तिचे वडील. लियाकत शेख यांनी आपल्याला न्याय मिळाला पाहीजे असं म्हटलं आहे. सतरा वर्षं सुरू असलेल्या या खटल्यादरम्यान तीन तपास यंत्रणा बदलल्या गेल्या. चार न्यायाधीश बदलले. खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान 40 साक्षीदारांनी साक्ष बदलली. 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे. पुरावे आणि साक्षीच्या आधारावर न्यायालय निकाल देतं. 17 वर्षं सुरू असलेला खटला,सात हायप्रोफाईल आरोपी, साक्षीदारांनी बदललेली साक्ष, तपासयंत्रणांमधले मतभेद आणि भगवा दहशतवाद शब्दाला जन्म देणाऱ्या या खटल्याचा निकाल काय लागणार, याची महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world