मुंबईत एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह अरबी समुद्रात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी इम्रान शेखला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कुलाबा पोलिसांना दक्षिण मुंबईतील ससून डॉकजवळ समुद्रात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या सावत्र मुलीची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली.
( नक्की वाचा: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले )
मुलीची आई नाझिया घरकाम करते. ती मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा गेली होती तेव्हा इम्रानही तिच्यासोबत होता. पोलिसांनी नाझियाच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी अँटॉप हिल आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चिमुरडी तिचा सावत्र बाप इम्रानसोबत जाताना दिसली होती. यानंतर पोलिसांनी शेखच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती.
( नक्की वाचा: पुण्याहून परभणीला निघालेलं युगुल; अचानक नवजात बाळाला धावत्या बसमधून दिलं फेकून, प्रवासी हादरले! )
पोलिसांना इम्रानवरच मुख्य संशय येत होता, जो खरा ठरला. पती-पत्नीमधील काही वादामुळे डोकं फिरल्याने या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली. नाझियाचे तिसरे तर इम्रानचे दुसरे लग्न असून ज्या मुलीचा इम्रानने खून केला आहे ती नाझियाची दुसऱ्या पतीपासून झालेली मुलगी आहे. ही मुलगी नाझिया आणि इम्रानसोबतच राहात होती. ही बाब इम्रानला आवडत नव्हती आणि त्यावरून त्याचे आणि नाझियाचे भांडण होत होते. ही मुलगी इम्रानला अब्बा म्हणायची. हे देखील इम्रानला आवडत नव्हते. यातूनच त्याने या मुलीची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
(नक्की वाचा: वाहतूक पोलिसाला मारहाण करणं पडलं महागात, बाप-लेकासह साथीदाराला अटक; आज कोर्टात हजर करणार )