वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांचे रोजच नव नवे कारनामे उघडकीस येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून पूजा खेडकर यांना ऑगस्ट 2022 रोजी त्या 7 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या प्रमाणपत्रासाठी त्यांनी आपण पिंपरी चिंचवडचे रहिवासी असल्याचं सांगत पुराव्या खातर एक रेशनकार्ड दिलं होतं . मात्र प्रत्यक्षात या रेशनकार्डावरील पत्त्यावर एक औद्योगिक कंपनी असल्याचं आढळून आलं आहे. याच कंपनीचा पत्ता आपण त्या ठिकाणी राहत असल्याचं म्हणून पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सादर केला होता.
पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील दिलेला पत्ता हा देहू - आळंदी रस्त्यावरील तळवडे ज्योतिबानगर गट क्रमांक 3 चा होता. या पत्त्याच्या जागी थर्मोव्हेरीटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाची औद्योगिक कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंद अवस्थेत आहे. या औद्योगिक कंपनीच्या संचालिका पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आहेत. त्यामुळं रहिवाशी पुरावा म्हणून सादर केलेल्या रेशनकार्डावरील पत्ताही बनावट असल्याचं आता उघडकीस झालं आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरीटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 2 लाख 77 रूपयांपेक्षा अधिकचा मिळकत कर ही थकवला असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - मनोरमा खेडकरांना पिस्तुल प्रकरण भोवलं; बेपत्ता होत्या..अखेर पोलिसांनी शोधलं, पहाटे अटक!
त्यामुळं आता पूजा खेडकर यांचे रेशन कार्ड बनवणारे आणि पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करणाऱ्या दोषींवर कारवाई होणार का हे पाहणे देखील आता महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. याच बाबतीत वाशीम पोलिसांनी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवला होता. याच चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांची त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे पूजा खेडकर यांना आयुक्त कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world