रिझवान शेख, मुंबई
सोशल मीडियावर चिनी बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सचा बुरखा फाडणाऱ्या एका 28 वर्षीय कंटेंट क्रिएटरला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासांत धडक कारवाई करत मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे. चेतन चंद्रकांत देओलकर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, तो इन्स्टाग्रामवर जनजागृती करणारे रील बनवतो.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
- यश रणधीर बाबरे
- प्रतीक राम शिंदे
- अनिकेत राम गोडसे
- समीर सुनील कुचेकर उर्फ एस.के.
नेमका प्रकार काय घडला?
पीडित चेतन देओलकर गेल्या आठ महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर अशा रील स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर्सचा पर्दाफाश करत होता, जे पैशांच्या लाभासाठी चिनी बेटिंग ॲप्स डाऊनलोड करण्याचे आवाहन नेटकऱ्यांना करत होते. यात त्याने आरोपी प्रतीक शिंदे याच्या बेटिंग ॲप प्रमोट करणाऱ्या रील्सवर 'रोस्ट व्हिडिओ' बनवून त्याला ट्रोल केले होते. याचाच राग मनात धरून आरोपींनी त्याला धडा शिकवण्याचा कट रचला.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
अपहरण आणि छळ
26 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आरोपी यश बाबरे याने चेतनला पवईतील पंचकुटीर येथे गाठले आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीजवळ नेऊन जबरदस्तीने गाडीत कोंबले. गाडीत आधीच बसलेल्या प्रतीक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर यांनी चेतनला सुऱ्याचा धाक दाखवला. त्याच्या मानेवर पाय ठेवून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली.
व्हिडिओ केला शूट
मारहाण करताना आरोपींनी चेतनला बेटिंग ॲप्सविरोधात रील न बनवण्याची धमकी दिली आणि या संपूर्ण अत्याचाराचा मोबाईलवर व्हिडिओही रेकॉर्ड केला. मारहाण केल्यानंतर आरोपींनी चेतनला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास कळंबोली (नवी मुंबई) परिसरात रस्त्यावर फेकून दिले आणि तिथून पळ काढला.
(नक्की वाचा- 'लोहगड हत्या' प्रकरणानंतर लग्न जुळवण्याची पद्धतच बदलली? नव्या ट्रेंडची धक्कादायक माहिती समोर)
पुण्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या
उपचार घेतल्यानंतर चेतन देओलकर याने 2 ऑगस्ट रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हलवली. आधी विक्रोळीतून यश बाबरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी प्रतीक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर यांना पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सापळा रचून अटक करण्यात आली. न्यायालयाने चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, याप्रकरणी पवई पोलीस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world