जाहिरात

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड वाहतुकीवर आता CCTV कॅमेऱ्यांची 'नजर',वैशिष्ट्ये पाहून चाट पडाल

मुंबई सागरी किनारी रस्त्यावर वेगमर्यादांचे पालन न करणे, शर्यती लावणे, आवाज नियंत्रणात न ठेवणे अशा तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत होत्या.

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड वाहतुकीवर आता CCTV कॅमेऱ्यांची 'नजर',वैशिष्ट्ये पाहून चाट पडाल
मुंबई:

मुंबई महानगरपालिकेने उभारलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने पूर्ण झाला आहे. शिवाय तो वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. महानगरपालिकेने या प्रकल्पावर ठिकठिकाणी मिळून, निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित  केले आहेत. या प्रणालीमुळे कोस्टल रोडवर  कोठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळणार आहे. शिवाय अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध होणार आहे. या रोडवरील प्रत्येक हालचालीवर या कॅमेऱ्यांची बारीक नजर असेल. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवण्यात येणार आहे. 

मुंबईकरांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, हा दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेने कोस्टल रोड उभारला आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेले, एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. 

Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड

असे आहेत कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्ये

1) अपघात ओळखणारे कॅमेरे (Video Incident Detection Camera) 

मुंबई कोस्टल रोडवर जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिका जवळ प्रत्येकी 50 मीटर अंतरावर अपघात ओळखणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन्ही बोगदे मिळून असे एकूण 154 कॅमेरे आहेत. जुळ्या बोगद्यांमध्ये कार अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप ओळख करतात. तसेच अशी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना देतात.

2) निगराणी कॅमेरे (PTZ  Camera)

सामान्यपणे वाहतूक सुरक्षेसाठी 71 निगराणी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यामधील व्हीआयडीएस प्रणाली (Video Incident Detection System) स्वयंचलित पद्धतीने सदर घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रित करते. दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये असे 71 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

3) वाहन मोजणी कॅमेरे (ATCC Camera)

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यांचे प्रवेशद्वार व निर्गमद्वारावर एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  

4) वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरे (Automatic Number Plate Camera)

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा नव्यानेच उभारण्यात आला असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची (नंबर प्लेट) नोंद हे कॅमेरे करतात.

नक्की वाचा - Indian Women: नवऱ्याने गळा आवळला, पोटात लाथा मारल्या, भारतीय महिलेच्या UAE मध्ये आढळला मृतदेह!

मुंबई सागरी किनारी रस्त्यावर वेगमर्यादांचे पालन न करणे, शर्यती लावणे, आवाज नियंत्रणात न ठेवणे अशा तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत होत्या. कॅमेरे लावल्यामुळे महानगरपालिका तसेच वाहतूक पोलिस यांना या प्रकारांवर नियंत्रण ठेवता येईल. हे कॅमेरे कार्यान्वित झाल्यामुळे आता हा महामार्ग 24 तास सुरू ठेवण्याचे महानगरपालिका प्रशासनाने नियोजन पूर्ण झाले आहे.या सुविधेमुळे मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत होत आहे. मुंबई किनारी रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com