Mumbai Crime News : मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. पोलीस हवालदाराच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि मुलाचा हात असल्याचं समोर आलं असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. प्रवीण शालीग्राम सुर्यवंशी असं या मृत पोलिसाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात प्रतिक्षानगर पोलीस अधिकारी वसाहत, सायन पूर्व येथे प्रवीण यांचे पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत कौटुंबिक वाद झाला. या वादातून दोघांनी प्रवीण यांना खोलीतील खिडकीच्या काचेवर ढकलून दिलं. यावेळी खिडकीच्या काचांमुळे प्रवीण यांच्या उजव्या हाताच्या नसा खोलवर कापल्या गेल्या. त्यांच्या डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यावेळी प्रवीण यांना उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात घेऊन जाणं अपेक्षित असताना दोघांनी वैद्यकिय उपचारासाठी घेऊन गेले नाही.
नक्की वाचा - NEET मध्ये 99.99%, MBBS साठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या काही तासांपूर्वी विद्यार्थ्याची आत्महत्या
त्यावेळी प्रवीण यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुरूवातीला वडाळा टीटी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान वडाळा टीटी पोलिसांनी आता प्रवीणची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलीस अधिक तपास करत आहेत.