Mumbai School Bus Accident : राज्यात पावसाला सुरुवात होताच मुंबईतील शाळेच्या बस अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या एका शाळेच्या बसवर भलमोठं पिंपळाचं झाड कोसळलं. या अपघातात ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तो चेंबूर भागात राहत होता. मुलाच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे.
विहान श्रीवास्तव हा विद्यार्थी आमदार तुकाराम काते यांच्या सोसायटीत राहत होता. पालिकेच्या गैरकारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप तुकाराम काते यांनी केला आहे. ते म्हणाले, आमचा कुटुंबातील मुलगा गेला. त्याच्या निधनामुळे आलेला दुःखाचा डोंगर सहन करणं कठीण आहे. चेंबूरमध्ये खूप जुनी झाडं आहेत. याचे सर्व्हेक्षण व्हायला हवं. याबाबत मी सभागृहात आवाज उठवल्याचं तुकाराम काते यांनी सांगितलं.
आई विहानची बॅट आणि दप्तर सोडेना...
विहानच्या आईने अवघ्या ११ वर्षांचा एकुलता एक मुलगा गमावला. विहानला क्रिकेटर व्हायचं होतं. चेंबुर येथील युनिव्हर्सल हायस्कुलमध्ये विहान शिकत होता. शाळा संपल्यानंतर तो क्रिकेटच्या वर्गासाठी थांबला. क्रिकेटचा सराव झाल्यानंतर तो बसने शाळेतून घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी पिंपळाचं झाडं बसवर कोसळलं. यानंतर तातडीने त्याला झेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र येथे उपचारादरम्यान सायंकाळी ४.३० वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. विहानची आई या घटनेनंतर हादरून गेली आहे. ती लेकाची बॅट आणि दप्तर घेऊन बसली आहे. लेक मोठा होऊन क्रिकेटर होईल असं स्वप्न विहानच्या आईनेही पाहिलं होतं. मात्र तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कुटुंबीय आणि शेजारच्यांनुसार तो अभ्यासात हुशार होता. शेजारच्यांनी सांगितलं की, त्याच्या आईला अद्यापही विश्वास बसत नाही की आपला मुलगा या जगात नाही. ती काल रात्रीपासून बॅट पकडून बसली आहे. आपलं लेकरू आता घरी येईल आणि मैदानात खेळायला जाईल. हे चित्र पाहिल्यावर लोक भावुक होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world