जाहिरात

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले अन् 1 कोटींना लागला चुना; साताऱ्यातील बाप-लेकासोबत काय घडलं?

शेअर मार्केटमुळे या बाप-लेकाला मोठं नुकसान झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले अन् 1 कोटींना लागला चुना; साताऱ्यातील बाप-लेकासोबत काय घडलं?
सातारा:

शेअर मार्केटमध्ये (Share Market fraud) पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून चौघांच्या टोळीने साताऱ्यातील बाप-लेकाला 1 कोटी 8 लाख 40 हजार 457 रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Satara Crime News) करण्यात आला आहे. शेअर मार्केटमुळे या बाप-लेकाला मोठं नुकसान झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कलिस्ता शर्मा, देव शहा, किकी शहा, सिद्धार्थ सिंग यांच्याविरुद्ध स्वप्निल भानुदास (वय 30) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 मार्च ते 5 जून 2024 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार युवकाला अनोळखी नंबरवरून फोन आला होता. अनोळखी व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यासंबंधी अनोळखी व्यक्तीने इतर तीन सहकाऱ्यांना फोन करायला लावून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. आरोपींकडून वारंवार तरूणाला फोन येत होता, त्यामुळे त्याला ही माहिती खरी वाटली. त्यानुसार तरुणाने वेळोवेळी बँक खात्यावर तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे 42 लाख 50 हजार रुपये पाठवले. 

एवढी मोठी रक्कम पाठवल्यानंतर त्याचा चांगला परतावा मिळत असल्याचे बाप-लेकांना सांगण्यात आलं. तसेच आणखी रक्कम गुंतवल्यास अधिक फायदा होईल, असं आमिष दाखवण्यात आलं. त्यानुसार तरुणाच्या वडिलांनी आपल्या खात्यातील 65 लाख 90 हजार 457 रुपये रक्कम वेळोवेळी बँक खाते, ऑनलाईनद्वारे पाठवले. अशाप्रकारे एकूण 1 कोटी 8 लाख 40 हजार 457 रुपये आरोपींना पाठवले. आरोपींकडून लवकरच चांगला परतावा मिळेल असं आश्वासन दिलं जात होतं. 

नक्की वाचा - 1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम

बाप-लेकही त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत होते. मात्र, पैसे जमा झाले नाहीत. सुरुवातीला त्यांनी लवकरच पैसे बँकेत येतील असं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांनी संपर्क केला तर आरोपी प्रतिसाद देत नव्हते. यामुळे शंका आल्याने तक्रारदार यांनी अधिक माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेने त्यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी तात्काळ सातारा तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मात्र, संशयित परराज्यातील असल्याने पोलीस तपासावर मर्यादा येतात. रक्कम कमी असल्याने पोलीस फासरं लक्ष देत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र या प्रकरणात रक्कम मोठी असल्याने पोलिसांची भिस्त तांत्रिक तपासावरच असेल. तालुका व सायबर पोलीस याचा तपास कसा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकी फसगत झाली कुठे?
शेअर मार्केटच्या माध्यमातून सीआयएनव्ही अॅपद्वारे तक्रारदारांना पैसे गुंतवण्यास सांगितले. तरुणाने त्या अॅपवर पाहिले. चांगला परतावा मिळत असल्याचे पाहून युवकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पैसे निघत नव्हते. अशावेळी आरोपींनी पैसे काढण्याअगोदर शासनाचा टॅक्स भरावा लागेल, असं सांगून वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगितली. यातूनच फसगत होत गेली व रकमेचा आकडा वाढत गेला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com