Nagpur Crime: नागपुर शहरातील न्यू नंदनवन परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका तरुण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणासोबत त्याची नातलग मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. सुरुवातीला तरुणाने प्रेयसीला जखमी करुन स्वतःला संपवले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक वळण लागले असून तरुण- तरुणी चुलत भाऊ बहीण असल्याचं समोर आले आहे.
चुलत बहिणीनेच केली भावाची हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरातील न्यू नंदनवन परिसरात 27 वर्षीय बालाजी कल्याणे हा मृतावस्थेत आढळून आला होता तर त्याच्यासोबत रती देशमुख नावाची तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. प्राथमिक तपासात प्रियकराने प्रेयसीला जखमी करून स्वतःला संपवले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांना या प्रकरणात एक वेगळाच अँगल सापडला आहे.
बालाजी कल्याणे आणि रती देशमुख हे चुलत भाऊ बहीण असल्याचं समोर आले आहे. बालाजी कल्याणे हा पोलीस भरतीची तयारी करत होता तर रती देशमुख ही आयुर्वेद महाविद्यालयात बी.ए.एम.एस. (BAMS) इंटर्न म्हणून प्रशिक्षण घेत आहे. दोघांचेही गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बालाजी रतीसोबत राहण्यासाठी नांदेडहून नागपूरला आला होता. त्यांच्या एकत्र राहण्यामुळे कुटुंबात भुवया उंचावल्या होत्या आणि या अनैतिक संबंधांवर कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर होता.
दुसरीकडे रतीलाही त्याच्याशी संबंध ठेवायचे नव्हते, त्यामुळे तिनेच आपल्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रतीला तिचा चुलत भाऊ बालाजी कल्याणे याच्या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. सध्या ती जीएमसीएच ट्रॉमा सेंटरमध्ये पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात उपचार घेत आहे.
प्रेमसंंबंधातून भयंकर घटना..
मृत तरुणाच्या छातीवर चार खोल आणि दोन वरवरच्या चाकूच्या जखमा आढळल्या असून त्यामुळे आत्महत्येची शक्यता कमी होते. याशिवाय, रतीने तिच्या व्हॉट्सॲप आणि एसएमएस इनबॉक्समधून सर्व संदेश आणि चॅट्स डिलीट केले होते, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. घटनेदिवशी शेजाऱ्यांनी पहाटे साडे तीन च्या सुमारास रतीच्या किंकाळ्या ऐकल्या. शेजारी धावत आले असता त्यांना दिसले की स्वयंपाकघरात झोपलेला बालाजीचा रूम पार्टनर, पवन ताडे, मागील दारातून बाहेर येत होता. बालाजी आणि रतीची खोली आतून कडी लावलेली होती.
बालाजीची शरीरयष्टी मोठी असल्याने, वार करण्यापूर्वी त्याला गुंगीचे औषध दिले असावे, अशी पोलिसांना शंका आहे. पोलीस हत्येपूर्वीच्या दिवसांमध्ये कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कॉल आणि भेटींची चौकशी करत आहेत. न्यायवैद्यक पथकं अपार्टमेंटमध्ये बाहेरील व्यक्तीच्या बोटांचे ठसे आणि डीएनए शोधत आहेत. दरम्यान, या प्रकरणात त्रिकोणी प्रेम प्रकरणाच्या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत. नंदनवन पोलिसांनी रतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु ती रुग्णालयात असल्याने तिला अद्याप अटक केलेली नाही. पोलीस या खुनाच्या नेमक्या हेतूचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world