संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उधारीचे पैसे मागितले म्हणून गुंडांनी बार उद्ध्वस्त केला. नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उर्वशी बारमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता स्थानिक गुंडांनी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाठ्या, काठ्या घेऊन उर्वशी बारमध्ये हल्ला चढवला आणि बारच्या आतील काचा, काउंटरवर ठेवलेल्या बाटल्या तोडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बारमध्ये पळापळ सुरू झाली होती. ग्राहक बारमधून बाहेर पळून गेल्यावर या गुंडांनी बारचा मॅनेजर आणि अन्य कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना मारहाण सुरू केली.
अडीच मिनिटात खेळ खल्लास..
लाथाबुक्क्यांनी आणि हातातल्या शस्त्रांनी त्यांना मारहाण केल्यावर गुंडांनी पुन्हा काउंटर आणि बारमधील टेबलांवर लाठ्या काठ्यांनी वार केले आणि हैदोस घातला. अवघ्या दोन अडीच मिनिटांत त्यांनी बारची पार दुर्दशा केली आणि धमक्या देत निघून गेले.
या घटनेमागे दोन दिवसांपूर्वीच घडलेला वाद कारणीभूत मानला जात आहे. स्थानिय गुंडांनी दोन दिवसांपूर्वी या बारमध्ये मद्य प्राशन आणि जेवण केले होते. मात्र बिल न देता वाद घातला होता. त्यावेळी, हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप सुनावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.