Nagpur News: नागपूर शहरात पुन्हा एकदा गँगवार भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला त्याच दिवशी शहरात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. नागपूरच्या गुन्हेगारी जगतातील कुख्यात नाव असलेल्या शेखूच्या पुतण्याची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मक्याचे कणीस खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा संपूर्ण प्रकार घडला असून या घटनेमुळे उपराजधानीत टोळीयुद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फुटाळा तलाव परिसरात सोमवार संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, असद उर्फ अमन खान, मयूर जाधव आणि त्यांचे काही साथीदार फुटाळा तलावाजवळ कणीस खाण्यासाठी गेले होते.
कणीस आणायला गेलेल्या मयूरचा तिथे उपस्थित असलेला लाला पांडे आणि त्याच्या साथीदारांशी किरकोळ वाद झाला. हा वाद पाहता पाहता इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले आणि लालाने आपल्या इतर माणसांना तिथे बोलावून घेतले.
( नक्की वाचा : Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार! )
या हिंसक हाणामारी दरम्यान लाला पांडे आणि त्याच्या साथीदारांनी धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कुख्यात गुंड शेखूचा लाडका पुतण्या असद उर्फ अमन खान याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. तर त्याचा मित्र मयूर जाधव हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत असद हा नागपूरच्या गुन्हेगारी जगतात मोठे नाव असलेल्या शेखूचा पुतण्या असल्याने या घटनेमुळे पोलीस दलात आणि शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या हत्येनंतर नागपूर पोलीस आणि क्राइम ब्रँचने तात्काळ चक्रे फिरवली. पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत या प्रकरणातील 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला शिवाकांत पांडे, जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Akola News: भूखंडाच्या फाईलसाठी मागितली लाच अन् थेट ACB नं आवळल्या मुसक्या; अकोल्यातील बड्या अधिकाऱ्याला अटक )
पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची भीती
नव्या पोलीस आयुक्तांच्या पहिल्याच दिवशी कुख्यात शेखूच्या कुटुंबातील सदस्याची हत्या झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई करत मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या तरी फुटाळा तलाव परिसरात सध्या कमालीचा तणाव आहे. या हत्येचे रक्तरंजित पडसाद येत्या काही दिवसांत उमटू शकतात. नागपुरात पुन्हा वर्चस्वाची लढाई सुरू होऊन गँगवार भडकू शकते, अशी भीती गुन्हेगारी विश्वातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.