संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री ऑडी कारने काही वाहनांना धडक दिली. ज्या कारनं ही धडक दिली ती कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेंच्या मालकीची आहे. इतकंच नाही तर हा अपघात झाला तेंव्हा संकेत बावनकुळे कारमध्येच होते, हे उघड झालं आहे. या प्रकरणात पोलीस संकेत यांना वाचवत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय. त्याचवेळी या प्रकरणाचं काँग्रेस कनेक्शन उघड झालं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपुरात संकेत बावनकुळेच्या ज्या ऑडी कारने तीन इतर कार आणि दुचाकी ला धडक दिली. ती कार अर्जुन हावरे चालवत होता. नागपूर पोलिसांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधूनही तेच उघड झालं आहे. ही कार चालवणाऱ्या अर्जुनचं काँग्रेसशी कनेक्शन आहे. त्याचे वडील जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.
जितेंद्र हावरे यांनी एकदा नागपूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. ते नागपूर महापालिकेच्या खामला मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. गेले काही वर्ष ते सिव्हील कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय सांभाळत असून ते आता काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात तेवढे सक्रिय दिसत नाहीत. मात्र काँग्रेस नेत्यांसोबत त्यांची बऱ्या प्रमाणात छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जितेंद्र हावरे यांनी आपला फेसबुक अकाऊंट सध्या लॉक करून ठेवल्याचे आहे.
( नक्की वाचा : Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे )
नागपूर पोलिसांचा खुलासा
नागपूर पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ऑडी कारनं ही धडक दिली त्या कारचा चालक मद्याच्या अंमलाखाली नव्हता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मद्यप्राशन करणे आणि मद्याच्या अंमलाखाली असणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत, असं पोलिसांनी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीमध्ये स्पष्ट केलं आहे.
संकेत बावनकुळे यांनी मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास का दिली? या प्रश्नावर आरोपी वाहन चालक अर्जुन हावरेनं मद्यप्राशन केले असले तरी तो मद्याच्या प्रभावाखाली नव्हता. त्याच्या डोळ्यांची बुबुळे, श्वासाची गती, हृदय गती तपासणी केली. त्यानंतर तो मद्याच्या प्रभावात नव्हता हे तपासणी अहवालात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world