प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील रमकुबाई नगरात राहणारी भाग्यश्री गौरव चौधरी (वय 29) या विवाहित महिलेने आपल्या (सासरी) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाग्यश्रीच्या आई संगीता सुनील चौधरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाग्यश्रीचा पती गौरवकुमार जगदीश चौधरी (वय 35) याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. भाग्यश्रीचा याला विरोध होता. त्यामुळे गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. यातूनच तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गौरव चौधरी हा पत्नी भाग्यश्रीला वारंवार मारहाण करीत होता. गौरवचे विवाहबाह्य संबंध होते. भाग्यश्रीने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यात यश मिळालं नाही. उलट, तिला अधिक जाच सहन करावा लागला. भाग्यश्रीच्या माहेरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवून ठेवला. मात्र, दररोज होणारा त्रास असह्य्य झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं.
मृत भाग्यश्री चौधरीच्या आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आलं असून शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.जे. पटेल यांच्या कोर्टात दोघांना हजर केले गेले. यात गौरव चौधरीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
