राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik News: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नियोजित असलेल्या रिंगरोड प्रकल्पातून आता एक खळबळजनक जमीन घोटाळा समोर येत आहे. लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात आणि प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने संगनमत करून रिंगरोडच्या संभाव्य मार्गालगतच्या जमिनी आधीच लाटल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी केल्या होत्या, त्या आता सरकारी भूसंपादनात जात असून खरात कुटुंबाला यातून कोट्यवधींचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. हा केवळ योगायोग आहे की गोपनीय माहितीच्या आधारे रचलेला मोठा आर्थिक खेळ, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण?
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारा 66 किलोमीटरचा रिंगरोड उभारला जात आहे. या प्रकल्पाचा मार्ग निश्चित होण्यापूर्वीच खरातने आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावे जमिनी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी परिसरात सुमारे 31 गुंठे आणि गौळाणे गावात खरात व त्याच्या पत्नीच्या नावे 71 गुंठ्यांहून अधिक जमीन आहे. अशा एकूण 102 गुंठे जमिनी थेट रिंगरोडच्या भूसंपादनात जात आहेत.
या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून दोषींना थेट बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
इनसाइड इन्फॉर्मेशन आणि दीड कोटींचा मलिदा
या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे जमीन खरेदीची वेळ आणि पद्धत. पाथर्डी येथील 3180 चौरस मीटर जमीन अशोक खरातची मुलगी सृष्टी आणि एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर रिंगरोडचा मार्ग निश्चित होण्याआधीच खरेदी करण्यात आली होती.
अत्यंत कमी किमतीत घेतलेल्या या जमिनीला आता सरकारी भूसंपादनातून पाचपट दराने मोबदला मिळणार आहे. केवळ एका व्यवहारातून खरात कुटुंबाला 1.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याची चर्चा आहे. सरकारी प्रकल्पाची गोपनीय माहिती वापरून हा व्यवहार केल्याचा संशय आता बळावला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे हादरलं! दारूच्या नशेत चोरली PMPML बस आणि सुसाट सुटला; FC रोडवर हजारो जीव टांगणीला )
दहा ठिकाणी शेतजमीन आणि 12 ठिकाणी प्लॉट
अशोक खरातचे कारनामे केवळ 102 गुंठ्यांपुरते मर्यादित नाहीत. रिंगरोडच्या संभाव्य मार्गापासून 0 ते 1000 मीटरच्या अंतरात खरात आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावावर तब्बल 10 ठिकाणी शेतजमीन आणि 12 ठिकाणी प्लॉट असल्याची नोंद समोर आली आहे.
एकीकडे खरातच्या काळ्या कृत्यांवर कारवाई सुरू असताना, दुसरीकडे सरकारी तिजोरीतून त्याच्यावर कोट्यवधींचा वर्षाव होणार का, असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत. गोपनीय माहितीचा गैरवापर करून जनतेच्या पैशातून ही 'लॉटरी' लावणाऱ्यांची सखोल चौकशी होणे आता गरजेचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world