किशोर बेलसरे
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यात एक आरोपी चक्क पोलिसांना चकवा देत त्यांच्याच समोर हातावर तुरी देवून पळाला आहे. पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हा व्हिडीओ आहे नाशिक जिल्ह्यातील. आरोपीचं नाव आहे क्रिश शिंदे. तो पळण्यात यशस्वी झाला खरा. पण पोलिस शेवटी पोलिसच. आरोपी कुठल्याही बिळात लपला तरी त्याला शोधून काढण्याचा त्यांचा हातखंड आहे. त्यांनीही मग सिने स्टाईल याच क्रिशच्या 12 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राण घातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी क्रिश शिंदे हा मंगळवारी सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन सिने स्टाईल फरार झाल्याची घटना घडली होती. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात क्रिश शिंदे याने एकावर कोयत्याने प्राण घातक हल्ला केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी क्रिश शिंदे याला अटक करून कोर्टात हजर केले होते. त्याला कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना क्रिश शिंदे यांने पोलिसांना चकवा देत मित्राच्या मदतीने सिनेस्टाईल पळ काढला होता.
पोलिसांच्या हाताला हिसका देत तो पळाला. त्याचा काही पोलिसांनी पाठलाग केला. पण काही अंतरावर क्रिशचा मित्र टु व्हिलर घेवून उभा होता. किरण परदेशी असं मदत करणाऱ्याचं नाव आहे. पोलिस त्याला पकडणार त्याच वेळी उडी मारून तो गाडीवर बसला, आणि गाडी पोलिसांसमोरच वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून गेली. पोलिस बघतच राहीले. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. त्यामुळे पोलिसांना टिकेचे धनीही व्हावे लागले होते.
आता त्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.त्यांनी तातडीने आपली सुत्र हलवली. सर्वात आधी क्रिशला पळण्यात मदत केलेल्या किरण परदेशीला ताब्यात घेण्यात आलं. त्याने क्रिश कसाऱ्याच्या जंगलात लपल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. पोलिस कसारा घाटाच्या जंगलात शिरले. त्यांनी तिथेच लपलेल्या क्रिशच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला घेवून पोलिस स्थानकात दाखल झाले. 12 तासाच्या आत त्याला परत गजाआड करण्यात आले.