नाशिक:
किशोर बेलसरे, प्रतिनिधी
चोरीच्या घटना या आपल्यासाठी काही नवीन नाहीत. रात्रीच्या अंधारात दुचाकीचं लॉक तोडून दुचाकी घेऊन फरार झाल्याचे अनेक व्हिडिओही पाहायला मिळतात. मात्र नाशिकमधून (Nashik Crime News) एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. मात्र दुचाकीमधील पेट्रोल संपल्यामुळे चोराने पुन्हा बाईक जागेवर आणून लावल्याचा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
पेट्रोल संपताच चोरलेली दुचाकी परत आणून जागेवर ठेवल्याची घटना सातपूर परिसरातील सावरकरनगर येथे घडली. सावरकर नगरमधील गजानन अपार्टमेंट येथे पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेताना दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी नकली चावीच्या साहाय्याने दुचाकी चोरून नेली. मात्र काही अंतरावर जाऊन या दुचाकीमधील पेट्रोल संपल्यानं चोरट्यांनी पुन्हा माघारी आणून दिल्याचं सीसीटीव्हीत दिसून येतंय. या आधी देखील येथून मोटर सायकली चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पेट्रोल संपलं म्हणून पुन्हा आणून दिल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
नक्की वाचा - मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral
याबाबत रविवारी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांची गस्त वाढवून चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.