Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील नागरिकांना 'पोलीस' असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका कुख्यात सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या आरोपीवर MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1 कोटी 25 लाख 10 हजार 686 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव सज्जाद गरीबशहा इराणी असे आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, इराणी याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. केवळ नवी मुंबई परिसरात त्याने बनावट पोलीस बनून फसवणुकीचे 15 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याची फसवणूक करण्याची पद्धत आणि सराईत गुन्हेगारी पाहता, नवी मुंबई पोलिसांनी त्याच्यावर MCOCA कायद्यानुसार कारवाई केली आहे.
अशी झाली फसवणूक
हा प्रकार 31 जुलै 2025 रोजी खारघर परिसरात उघडकीस आला. खारघर येथे पवनकुमार रामअवतार केजरीवाल (वय 68) हे घरगुती वस्तू खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सज्जाद इराणी याने त्यांना रस्त्यात थांबवले. त्याने स्वतःचे खोटे पोलीस आयडी कार्ड दाखवून, आपण पोलीस असल्याचे भासविले.
( नक्की वाचा : Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले? )
इराणीने केजरीवाल यांना 'रमेश पाटील नावाच्या व्यक्तीच्या घरी गांजा सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे', असे सांगितले. यामुळे परिसरामध्ये कारवाई सुरू आहे असे भासवून, आरोपीने केजरीवाल यांना त्यांच्याकडील सोन्याची चैन व अंगठी 'सुरक्षित' ठेवण्यासाठी आपल्याकडे देण्यास सांगितले. केजरीवाल यांचा विश्वास संपादन झाल्यावर आरोपीने त्यांचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरातील २० ते 25 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपी टीव्हीएस अपाची मोटरसायकल (MH 15 BA 1617) वापरताना दिसला.
गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या अचूक बातमीच्या आधारे, गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या परवानगीने 12 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यात छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी आरोपी सज्जाद इराणी याची पत्नी फिजा सज्जाद इराणी हिला ताब्यात घेतले.
( नक्की वाचा : Tiger Attack : बस चुकली अन् वाघाने गाठलं, वरातीला निघालेल्या तरुणांवर जीवघेणा हल्ला, 3 KM रंगला थरारक खेळ )
1 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या पत्नीकडे केलेल्या चौकशीत पोलिसांनी मोठा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये सुमारे 1186 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले. या दागिन्यांमध्ये बांगड्या, नेकलेस, मंगळसूत्र, चैन, कानातील झुमके, ब्रेसलेट, पेंडंट आणि अंगठ्या यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आरोपी फसवणुकीसाठी वापरत असलेले बनावट पोलीस आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस अपाची मोटरसायकलही जप्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 25 लाख 10 हजार 686 रुपये इतकी आहे.