Tiger Attack : जंगलाच्या वाटेवरून वरातीला निघालेल्या तीन तरुणांसाठी रविवारची संध्याकाळ काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. मोटारसायकलवरून वेगाने जात असताना अचानक एका वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा जीवघेणा प्रसंग इतका भयानक होता की, क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, मोटारसायकल चालवणाऱ्या युवकाच्या प्रसंगावधानाने आणि धाडसाने तिघांचेही प्राण वाचले. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काय घडली घटना?
राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील महाराजपुरा वनक्षेत्रातील चौहान का नाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली. महाराजपुरा गावातील 3 तरुण गिरधारी माली (चालक), हरीओम चौधरी आणि महेश योगी हे सवाई माधोपूर येथील खंडार येथे वरातीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. त्यांची बस चुकल्यामुळे, तिघेही एकाच मोटारसायकलवर स्वार झाले होते. याच रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची हालचाल दिसत होती, तो T-80 'तूफान' नावाचा वाघ अचानक झुडपातून बाहेर आला आणि थेट त्यांच्या मोटारसायकलसमोर उभा राहिला.
(नक्की वाचा : Pune News : 5 तासांचा 'ट्रॅफिक जाम' : बिबट्याच्या दहशतीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, प्रशासनाला थेट आव्हान )
पाठीवर पंजा मारला....
वाघ अगदी समोर आल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या महेश योगी यांच्यावर वाघाने थेट पंजाने हल्ला केला. महेश योगी यांच्या पाठीवर अनेक ठिकाणी ओरखडे आले आणि ते यामुळे खूप घाबरले. जखमी झालेल्या महेश योगी यांना तातडीने बालेर रुग्णालयात नेण्यात आले, जिथून त्यांना पुढील उपचारासाठी सवाई माधोपूर येथे हलवण्यात आले. उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे.

3 KM मागे वळून पाहिलं नाही
जीवघेणा हल्ला झाला असतानाही मोटारसायकल चालवणाऱ्या गिरधारी माली यांनी दाखवलेल्या प्रसांगावधानामुळे या तिघांचे प्राण वाचले. गिरधारी माली यांनी सांगितले, 'माझ्यासमोर वाघ आला, पण मी मोटारसायकलचा वेग कमी केला नाही. भीतीमुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, मी जवळपास 3 किलोमीटरपर्यंत मागे वळून पाहिले नाही.' त्यांच्या या धाडसी कृतीनेच ते मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडू शकले.
या हल्ल्यात जखमी झालेले महेश योगी यांनी हा भीतीदायक अनुभव सांगितला.'मी आयुष्यात पहिल्यांदाच वाघ पाहिला. पाठीवर हल्ला होताच माझा जीवच गेला होता. मी कसा वाचलो, हे मलाही माहिती नाही,' असे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच महाराजपुरा वनपाल राजेश जाट आणि इतर वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या भागात वाघाचे पदचिन्ह (पाऊलखुणा) असल्याचा दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात वाघाच्या हालचालींवरची निगरानी (पाळत) आणखी वाढवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world