राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील खारघर परिसरात विवाहितेचा शारीरिक,मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहेरून पैसे व कार आणण्याचा दबाव,56 तोळे सोन्याचा अपहार आणि खासगी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेनं खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती खारघर सेक्टर 16 मध्ये वास्तुविहार परिसरात राहत होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार,10 फेब्रुवारी 2019 पासून सासरच्या मंडळींकडून सतत छळ सहन करावा लागला.पती सुहास उत्तम धनवे (38), सासरे उत्तम हसू धनवे (68),सासू राजश्री उत्तम धनवे (63) आणि नणंद प्रियंका सिद्धांत रणदिवे (रा.टिटवाळा) यांनी संगनमताने हा छळ केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
माहेरून पैसे व कारसाठी दबाव
तक्रारीनुसार,सासरच्या मंडळींकडून वारंवार माहेरून पैसे आणि कार आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता.मागण्या पूर्ण न केल्यास महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता.इतकेच नव्हे तर,तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आणि अनैतिक संबंधांसाठी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> शिंदेंना शह देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केला CM फडणवीसांना संपर्क? पाहा व्हिडीओ
56 तोळे सोन्याचा अपहार
तक्रारदार महिलेच्या मालकीचे सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 56 तोळे सोन्याचे दागिने सासरच्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारल्यास खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.त्यानंतर पीडितेला तिच्या
अल्पवयीन मुलीसह घराबाहेर काढण्यात आले.
नक्की वाचा >> CCTV Video : "धंदा करायचा असेल तर महिन्याला हफ्ता द्या.." डोंबिवली देसलेपाड्यात गावगुंडांची दहशत, एकाला चोपलं
खारघर पोलिसांची कारवाई
या गंभीर प्रकरणी खारघर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ८६, ३१६(२), ३१८(४), ११५(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड पुढील तपास करत आहेत.या घटनेमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.