
राहुल कांबळे, प्रतिनिधी
खारघर परिसरात सोमवारी सकाळी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका पतीने आपल्या पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोघांचाही मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिला सपना नोतनदास (वय 35 वर्षे) या मूळच्या पाकिस्तानी नागरिक असून त्या खारघरच्या सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राइड सोसायटी येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होत्या. त्यांच्या पतीचे नाव नोतनदास उर्फ संजय सचदेव (वय 45 वर्षे) असे आहे. घटनेच्या वेळी दोघे घरी एकटेच होते.
घरगुती वादातून दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहिती नुसार संगीता सेवक माखीजा या मृत महिला सपनाच्या बहीण आहेत. त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्या घरी गेल्या. तिथे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. तातडीने पोलीस आणि वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, सपना यांचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आणि नंतर तिच्या पतीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नक्की वाचा - Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला
स्वयंपाकघरातील चाकूने केले वार
पोलीस तपासात समोर आले आहे की, नोतनदास यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून पत्नी सपना यांच्याशी वाद घातला आणि त्या वादाच्या दरम्यान संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील धारदार चाकूने सपनाच्या गळ्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करून तिचा जीव घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार केले, ज्यात त्यांचा देखील मृत्यू झाला.
पाकिस्तानी नागरिकत्व आणि भारतातील वास्तव
सपना नोतनदास आणि त्यांचे पती नोतनदास हे दोघेही पाकिस्तानातील मूळ रहिवासी होते. ते नोव्हेंबर 2024 मध्ये लॉंग टर्म व्हिजिट व्हिसावर भारतात आले होते. सध्या त्यांना दोन मुलांसह खारघरमध्ये भाड्याच्या घरात सहा महिन्यांपासून वास्तव्यास होते. दोघांचे व्हिसा आणि ओळखपत्र तपासणीसाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
नवी मुंबई खारघर पोलीसानी कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सपना आणि नोतनदास यांच्या दोन्ही मुलांची पुढील काळजी कोण घेणार, याबाबत पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे.
घटनेतील महत्त्वाचे मुद्दे:
- मृत महिला सपना आणि तिचे पती मूळचे पाकिस्तानी नागरिक
- लॉंग टर्म व्हिजिट व्हिसावर नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात आगमन
- घरगुती वादातून पत्नीची हत्या व पतीची आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
- या प्रकरणामुळे नवी मुंबई खारघर सेक्टर 34 मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world