Navi Mumbai APMC Market News: नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ मार्केटमधून धक्कादायक आरोप समोर आला आहे. मार्केटमधील कचऱ्यात फेकून दिलेली सफरचंदे, तसेच डिफेक्ट असलेले आंबे, पेरू, लिची आदी फळे काही जण गोळा करून एपीएमसी मार्केटबाहेर तसेच मुंबई, ठाणे आणि परिसरातील विविध बाजारपेठांमध्ये ₹100 ते ₹200 प्रति किलो दराने विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ
माहितीनुसार, निर्यातीसाठी (एक्सपोर्ट) अयोग्य ठरलेली किंवा काही प्रमाणात खराब झालेली फळे व्यापाऱ्यांकडून कचऱ्यात टाकली जातात. त्यानंतर काही जण ही फळे वेचून एपीएमसी मार्केटबाहेरील फूटपाथवर तसेच इतर ठिकाणी विक्रीसाठी आणत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये कचऱ्यातून सफरचंदे वेचणारी व्यक्ती ही फळे मुंबई, ठाणे आणि इतर भागात विकली जात असल्याचा दावा करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, स्वतःसह शेकडो जण अशाच प्रकारे कचऱ्यातून फळे गोळा करून विक्री करत असल्याचाही दावा संबंधित व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी खुलासा करणारे राहुल कांबळे यांनी एपीएमसी प्रशासनाला या प्रकाराची माहिती असूनही कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेकडूनही फूटपाथवरील या विक्रीविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काहींनी या प्रकरणात आर्थिक हितसंबंध असल्याचाही दावा केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
कचऱ्यातील फळे विक्रीसाठी बाजारात
या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्यातून उचललेली फळे ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत का? अशा फळांची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेची तपासणी केली जाते का, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, कचऱ्यातून उचललेल्या फळांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपांबाबत एपीएमसी प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world