राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मण गंगाधर काकडे (वय 36, रा. खेड, पुणे) असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं 2011 साली त्याच्याच सहकाऱ्याचा खून करून पळ काढला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2011 रोजी वाशी, सेक्टर 19 परिसरात गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आजीनाथ त्र्यंबक दौड (रा. अहमदनगर) याची हत्या करण्यात आली होती. मृत आणि आरोपी हे ट्रक चालक व क्लीनर म्हणून एकत्र काम करत होते. 1000 रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून आरोपीने सहकाऱ्याचा खून केला होता. या प्रकरणामध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
कसा लागला शोध?
या खुनानंतर आरोपी लक्ष्मण काकडे फरार झाला होता. पोलीसांनी 2015 साली आरोपीविरुद्ध सीआरपीसी कलम 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतरही आरोपीचा शोध लागलेला नव्हता.
( नक्की वाचा : Navi Mumbai : आई-वडिलांच्या मृत्यूचा धक्का! 3 वर्ष ठेवले स्वत:ला केले कैद, संपूर्ण प्रकार वाचून डोळ्यात येईल पाणी )
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास नव्याने सुरू करण्यात आला. केंद्र सरकारनं विकसित केलेल्या NATGRID पोर्टल आणि अन्य तांत्रिक माध्यमांद्वारे आरोपीबाबतची माहिती मिळवण्यात आली. डेटा विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा खेड, जिल्हा पुणे येथे असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सुनील शिंदे यांच्या पथकाने खेड येथे धाड टाकून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला अटक करून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे.