अश्विनी धायगुडे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात प्रेमात वेडा झालेल्या एका माथेफिरू तरुणाने तरुणी आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्याच्या एका हॉटेल मध्ये काम करतात. काम संपल्यानंतर बुधवारी पहाटे दोघेही ताडीवाला रोड येथील आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते. याच वेळी आरोपी सरुनवर दबा धरून बसला होता. पीडित तरुणी ही त्याचा रोष झुगारून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. याचा राग त्याच्या मनात होता. श्रीरामने तिचा रस्ता अडवला आणि "तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही," अशी धमकी दिली.
काही समजण्याच्या आतच, आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रममधील 'अॅसिड'सारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. हे केमिकल तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर पडल्याने ती जागीच होरपळली. आरोपीने तिच्या मित्रांवर सुद्धा अॅसिड फेकले, ज्यामुळे त्याच्याही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघे ही जखमी झाले असताना, आरोपीने अंधाराचा फायदा तिथून पसार झाला. २१ वर्षीय पीडित तरुणीने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा सगळा प्रकार २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडला. तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. अखेर पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. श्रीराम मधु सरुनवर (वय २०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे
शहराच्या मध्यवस्तीत तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याचे समजताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.