जम्मू काश्मीरच्या पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हल्ला झालेल्या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर फोनवरून बातचीत केली. शाह हे तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यानंतर तातडीने पंतप्रधान मोदी यांनी अमित शाह यांच्या बरोबर चर्चा केली. त्यानंतर तातडीने पावलं उचलण्याचे आदेश त्यांनी दिले. शिवाय तातडीने काश्मीरला जा. घटनास्थळाला भेट द्या अशा सुचनाही मोदी यांनी यावेळी केल्या. त्यानंतर अमित शाह हे श्रीनगरला जाणार आहेत. शिवाय हल्ला झाल्यानंतर अमित शाह यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला गृह सचिवांसह आयबी प्रमुखही उपस्थित होते. जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल, सीआरपीएफ डीजी, जम्मू-कश्मीर डीजी, सेनेचे अधिकारी या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.
या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना पहलगाम इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात स्थानिक आणि पर्यटकांचा ही समावेश आहे. माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे. या शिवाय सात जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत, असं एका महिलेने सांगितलं. शिवाय त्यांच्यावर तातडीने उपचार केले जावेत अशी मागणीही तिने केली आहे. मात्र तिने आपली ओळख सांगितली नाही.
ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तातडीने पोलिसांनी कारवाई केली. पहलगामच्या बायसरन या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचले आहे असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पहलगाम हे दक्षिण काश्मीरचे अतिश सुंदर ठिकाण आहे. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक देशभरातून येत असतात. दरम्यान या हल्ल्यानंतर इथं येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या हल्ल्याचा जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निषेध केला आहे.