
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस मत्स्य व्यवसाय विभागासाठी आणि राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा" प्राप्त झाला आहे. त्यानंतर मत्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायाला थेट शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॅबिनेटने घेतलेला हा निर्णय गेमचेंजर निर्णय आहे अशी प्रतिक्रीया मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. देशात मासेमारीत महाराष्ट्रा हा सहाव्या क्रमांकावर आहे. तर गोड्या पाण्यातील मासेमारीत महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे. मात्र या निर्णयामुळे येणाऱ्या काही वर्षात मत्स्य व्यवसायात महाराष्ट्र पहिल्या 3 क्रमांकात असेल, असा विश्वास राणेंनी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मासेमारी करणाऱ्यांची ही मागणी होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. त्याचा थेट फायदा राज्यातील मासेमारी करणाऱ्यांना मिळणार आहे.

हा निर्णय घेतल्यामुळे काही फायदे मत्स्य व्यवसायिकांना मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यां प्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय किसान क्रेडीट कार्ड सुविधा, कृषीदरा नुसार कर्ज सहाय्य मिळणार आहे. मत्सशेतीस अल्पदरात विमा मिळेल. त्याच बरोबर शेतकऱ्यां प्रमाणे सौरउर्जेचे लाभ मिळण्यासही हे मत्स्य व्यवसायिक पात्र ठरणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने अँक्वाकल्चर मत्स्यशेती करण्यासाठी मच्छीमार पात्र ठरणार आहेत. त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
त्याच बरोबर शीत गृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी अनुदान मिळेल. तरुणांना या क्षेत्रात रोजगार मिळण्यास मदत होईल. मच्छीमारांना सरकारतर्फे रिलीफ पॅकेज ही मिळणार आहे. याचा फायदा मत्स्य उत्पादनावर ही होईल, त्यातून उत्पादनात भरीव वाढ होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यां प्रमाणे मच्छिमारांना ही आता नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर मच्छीमारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांची भेट घेत आभार मानले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world