पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) झालेल्या 73 लाख 13 हजार 884 रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळा आणि देयकांमधील फेरफार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) उपनेते तथा 'जिजाऊ संघटने'चे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्यासह जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे इतर भागीदार आणि तत्कालीन PWD अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अनेक तक्रारींनंतरही संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत असताना, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार अंतर्गत 2014-14 मध्ये '3054' या लेखाशीर्षाखाली वाडा, मोखाडा आणि जव्हार परिसरातील रस्त्यांची सात कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नावाने मंजूर करण्यात आली होती. कार्यारंभ आदेश देखील त्यांच्याच नावाने होते.
2019 मध्ये कागदपत्रांत फेरफार
कामे पूर्ण झाल्यानंतर मूळ अभियंत्यांच्या नावाने बिल न काढता, कागदपत्रे व नोंदींमध्ये कथित फेरफार करण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये 73 लाख 13 हजार 884 रुपयांचा सरकारी निधी जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश सांबरे यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या घोटाळ्याबाबत 2022 पासून मनोज खरपडे आणि रुपेश डोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली होती.
पालकमंत्री गणेश नाईक अॅक्शन मोडवर
पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांच्या चौकशी अहवालानंतर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी 28 ऑगस्ट 2026 रोजीच गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीही चालढकल होत असल्याने पालकमंत्री गणेश नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने एफआयआर (FIR) नोंदवण्याचे कडक आदेश दिले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक आणि संगनमत यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पालकमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जुना राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world