मनोज सातवी, पालघर:
Palghar Crime: अवैध सावकारीला कंटाळून डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या डहाणूमध्ये घडली आहे. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे 2 ऑगस्ट रोजीच्या आत्महत्ये प्रकरणी तब्बल 4 महिने 25 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबियांकडून वानगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सावकारीला कंटाळून आत्महत्या
समोर आलेल्या माहितीनुसार, पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावात सावकारांच्या जाचाला आणि अवाढव्य व्याजदराला कंटाळून डाय मेकिंग व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिंचणी येथील डायमेकर व्यावसायिक किशोर दवणे यांनी 2 ऑगस्ट रोजी केलेल्या या आत्महत्यामागचे कारण त्यांनी लिहलेली सुसाईड नोट सापडल्याने उघडकीस आले आहे.
या प्रकरणी अवैद्य सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात मंगेश चूरी, तुषार साळसकर, इंद्रजीत गुप्ता , अरविंद पाटील उर्फ पिंटा आणि नितीन जैन अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. त्यांच्यापैकी मंगेश चूरी आणि तुषार साळसकर यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
5 महिन्यांनी गुन्हा दाखल..
मयत किशोर दवणे यांनी डाय मेकिंगच्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज व्यवसायात आलेल्या मंदीमुळे तसेच भरमसाठ व्याजदर आणि सावकारी जाचामुळे, सततची शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली होती.
मात्र 2 ऑगस्ट रोजी झालेल्या आत्महत्ये प्रकरणी तब्बल 4 महिने 25 दिवसानंतर 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्याने वानगाव पोलिसांच्या भूमिकेवर पीडित कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि पालघर जिल्ह्यात फोफावणाऱ्या अवैध सावकारीला कशा पद्धतीने आळा घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
(नक्की वाचा: Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! बालदिनीच 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा छळ, शिक्षकानं 5-6 वेळा थोबाडीत मारायला लावलं, अन्..)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world