
मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar bogus doctor : पालघरच्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोर पालघर महामार्गावरील गोवाडे गावात सुरू असलेल्या दवाखान्यात छापा टाकत रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहित पांडे या बोगस डॉक्टर विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Palghar News) करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मोहित दिनेश पांडे नावाची व्यक्ती मनोर पालघर महामार्गावरील गोवाडे गावातील भुलानी स्टील कंपनी समोरच्या चंद्रकांत पाटील यांच्या मालकीच्या गाळ्यात दवाखाना थाटून रुग्णांवर अँलोपॅथी औषधांचा वापर उपचार करीत असल्याची माहिती मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. उपलब्ध माहितीनुसार मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अजगर यांनी गोवाडे येथील मोहित पांडे याच्या दवाखान्यावर छापा टाकला. यावेळी मोहित पांडे रुग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे वैद्यकीय अहर्ता धारण केलेल्या प्रमाणपत्राची मागणी केली असता तो प्रमाणपत्र दाखवण्यात अपयशी ठरला.
नक्की वाचा - ही चूक करू नका! हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू
रुग्णांवर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय अहर्ता तसेच शासनाने नोंदनिकृत केलेली पदवी नसताना रुग्णांवर उपचार केल्याने मोहित पांडे याने महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीस ऍक्टचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अजगर यांनी मनोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून बोगस डॉक्टर मोहित पांडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४), सह वैदयकीय व्यवहार अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३५, ३६ पनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world