- मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News: पालघर जिल्ह्यातील केळवे रोड रेल्वे स्थानक परिसरात दरोडेखोरांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. ममता ज्वेलर्सचे मालक किशन रुपसिंग दसाना (वय 24 वर्ष) यांच्यावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून त्यांच्याकडील सोने आणि मोठी रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरोड्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
केळवे रोड रेल्वे स्थानकात नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ममता ज्वेलर्सचे मालक किशन रुपसिंग दसाना आणि पत्नी मंजु दसाना हे दोघे दुकान बंद करून बाइकवरून घराच्या दिशेने जात होते. त्यावेळेस रेल्वे पुलाखाली पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्याकडील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लुटली. दरोडेखोरांनी दसाना यांना जखमी करून त्यांच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सोने 250 ग्रॅम, चांदी 6 किलो, 7 हजार रुपयांची रोकड असा एकूण 50 लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला आहे.
(नक्की वाचा: Pune News: पुण्याचा खरात! अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवले आणि महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त केले; 50 लाखही हडपले)
पोलीस प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख स्वतः फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नाक्यांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयास्पद वाहनांची कसून झाडाझडती घेतली जात आहे.
(नक्की वाचा: Nagpur News: दहशतवादी संबंधाची भीती, 2 कोटींचा गंडा; 76 वर्षांचा निवृत्त वैद्यकीय अधिकारी 11 भामट्यांच्या कैदेत, काय घडलं?)
विशेष म्हणजे केळवे रोड परिसरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 27 मार्च 2025 रोजी देखील एका ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने दरोडेखोरांनी गोळीबार करत पळ काढला होता. पण मंगळवारी (14 एप्रिल) रात्री झालेल्या घटनेत दरोडेखोर लूट करण्यात यशस्वी ठरल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली
केळवे रोड रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि रात्रीच्या वेळी असणारा शुकशुकाट याचा फायदा दरोडेखोर घेत आहेत. तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि वाढती गर्दी या गोष्टी गुन्हेगारांसाठी फायद्याचे ठरत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली असून दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.