जाहिरात

Parbhani News: दर्शनासाठी आलेल्या महिलेला गाठलं अन्...; परभणीच्या प्रसिद्ध मठात शिक्षकाचा संतापजनक प्रकार

Parbhani News: राज्यात अशोक खरात प्रकरणाने आधीच संतापाची लाट उसळलेली असताना, आता परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

Parbhani News: दर्शनासाठी आलेल्या महिलेला गाठलं अन्...; परभणीच्या प्रसिद्ध मठात शिक्षकाचा संतापजनक प्रकार
Parbhani News: विवाहित महिलेवर एका नराधम शिक्षकाने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. (प्रतिकात्मक फोटो)
परभणी:

नजीर खान, प्रतिनिधी

Parbhani News: राज्यात अशोक खरात प्रकरणाने आधीच संतापाची लाट उसळलेली असताना, आता परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पवित्र ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या विवाहित महिलेवर एका नराधम शिक्षकाने जिवाशी मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्हा हादरला असून, आरोपी शिक्षकाच्या मुजोरीने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील गुरुदुंडी स्वामी मठात दर्शनासाठी आली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी शिक्षक चंद्रशेखर मनमथ स्वामी याने तिच्यावर पाळत ठेवली. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिला गाठले आणि तिच्या अंगावर अगरबत्ती किंवा एखादा रासायनिक पदार्थ टाकून तिला गुंगी आणली.

शुद्ध हरपलेल्या अवस्थेत तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नाही तर, या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकीही या नराधम शिक्षकाने दिली.

( नक्की वाचा : Akola News : 'तू स्मार्ट दिसतेस, मुलीला पाठव'; पोलीस अधिकाऱ्याचा कोठडीतच प्रताप, अकोला हादरलं )
 

भयभीत महिलेचा पाठलाग आणि दुसऱ्यांदा अत्याचार

या घटनेमुळे अत्यंत घाबरलेली महिला आपल्या गावी परतली होती. मात्र, 30 मार्च रोजी ती पुन्हा दर्शनासाठी पूर्णा येथे आली असता, आरोपीने तिचा पुन्हा पाठलाग केला. तिला वाटेत अडवून धमकावत एका खोलीत नेले आणि पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना घडल्यानंतर महिला पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपीने तिला पुन्हा अडवले आणि तिला जबरदस्तीने नांदेड येथे नेऊन सोडले.

आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित महिलेने थेट नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व भीषण प्रकार पोलिसांना सांगितला. घटना पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तिथे झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी पूर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पूर्णा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे फिरवली आणि आरोपी शिक्षक चंद्रशेखर स्वामी याला बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Ashok Kharat: भोंदू कॅप्टनच्या पापात पत्नीही भागीदार? पाडळीच्या 'सुनीता'चा 'कल्पना'होण्याचा धक्कादायक प्रवास )

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीनेच अशा प्रकारचे नीच कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस चौकशीत या नराधमाने आणखी कोणाला अशा प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com