जाहिरात

Akola News : नामांकित पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी फसवणूक, गाड्या जागीच बंद झाल्याने धक्कादायक प्रकार उघड

अकोला शहरात आज सकाळी घडलेला प्रकार वाहनधारकांसाठी धक्कादायक ठरला आहे.

Akola News : नामांकित पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी फसवणूक, गाड्या जागीच बंद झाल्याने धक्कादायक प्रकार उघड

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

Akola News : अकोला शहरात आज सकाळी घडलेला प्रकार वाहनधारकांसाठी धक्कादायक ठरला आहे. अग्रेसर चौकातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरल्याने तब्बल दहा ते बारा दुचाक्या रस्त्यावरच बंद पडल्या. सकाळी आठ वाजताच्या सुमारास नागरिक आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले असता हा प्रकार उघडकीस आला. पेट्रोल पंपावर गेल्यावर दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर काही क्षणातच गाड्या बंद लागल्याने नागरिकांनी पंपावरील चालक आणि व्यवस्थापकांना प्रश्न विचारले असता यावर अजब खुलासा समोर आला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणामुळे पाण्याचा स्पर्श होताच पेट्रोल पाण्यासारखे दिसू लागते आणि इंजिन बंद पडते असं येथील व्यवस्थापक राजेंद्र सिंग सेठी यांनी म्हटलंय.

या घटनेमुळे त्रस्त वाहनधारकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि काही सामान्य नागरिक यांचा समावेश आहे. "आमच्या गाड्या दुरुस्त करून द्या," अशी मागणी या वाहनचालकांनी केली असून पंप व्यवस्थापकाने सर्व बंद पडलेल्या दुचाक्यांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या गाड्यांची दुरुस्ती सुरू आहे.

Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार

नक्की वाचा - Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार

अकोलेकरांनी केली यावर व्यंगात्मक टीका..!

दरम्यान, या घटनेवर नागरिकांनी टीका करताना व्यंगात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "एक लिटर पेट्रोल खरेदी करा आणि मिळवा अर्धा लिटर पाणी मोफत," अशी भन्नाट ऑफर मिळाल्याचा उपहास वाहनधारक करत आहेत. काहींच्या गाड्या ‘नळी पंप' मोडवर चालू लागल्याचे तर काहींनी गाड्यांना थेट कुलर लावण्याचा विचार सुरू केल्याचेही बोलले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आता पेट्रोल टाकी फुल्ल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि पोहण्याच्या स्विमिंग पूलवर जास्त धावेल असं दिसत आहे. 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची नोंद घेतली असून इंधन-पाणी मिश्रणावरील तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र एवढी मोठी चूक पंप चालकाकडून कशी झाली, याबाबत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला असून एखाद्या विद्यार्थ्यांचा जर पेपर यावेळी असता तर त्याला परीक्षेपासून मुकाव लागलं असतं. त्याचं शैक्षणिक नुकसान ही झालं असतं. त्यामुळे आता पेट्रोल कंपनी कोणती कारवाई करते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com