Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलह, संशयाचे भूत आणि घटस्फोटाचा टोकाचा राग एका निष्पाप सासऱ्याच्या जीवावर बेतला. भरदिवसा शेतात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण इंगळगी गाव हादरून गेलं आहे.
भरदिवसा घडला हत्येचा थरार...
मंगळवारची सकाळ...वेळ साधारण ११:३० ची. ५५ वर्षांचे सिकंदर मुलका शेख आपल्या इंगळगी येथील शेतात कामात मग्न होते. शेतात दुसरं कुणीही नसल्याची खात्री करून दबा धरून बसलेला जावई सादिक दफेदार समोर आला. मनात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसत असलेला राग आणि डोक्यात खुनाचे वेड घेऊन सादिकने थेट आपल्या सासऱ्यांवर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आत सादिकने धारदार शस्त्राने सासऱ्याचा गळा चिरला. सिकंदर शेख रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयाचे भूत आणि मोडलेला संसार
सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. सादिक तिच्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत असे. सासरा सिकंदर यांनी अनेकदा सादिकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सादिकच्या डोक्यातील संशयाचं भूत उतरलं नाही. सततच्या छळाला कंटाळून मुलीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मुलीला माझ्यापासून लांब केले, याच रागातून सादिकने सासऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं होतं.
स्वतःवर वार आणि आत्महत्येचा प्रयत्न ?
सासऱ्याची हत्या केल्यानंतर सादिक तिथून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी धाव घेतली. पकडलं जाण्याच्या भीतीने आणि भेदरलेल्या अवस्थेत सादिकने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या आरोपी जावई सादिकवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वळसंग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world