सूरज कसबे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना ब्ल्यू डार्ट कंपनीचा अधिकारी आणि मुंबई पोलीस असल्याचं भासवून तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सहा संशयित आरोपींना विविध राज्यांतून अटक करण्यात आली आहे.
तेलंगणा, कर्नाटक, केरळातून आरोपींना अटक
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि मुंबई असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला आणि सहा संशयित आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे:
* मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरिफ
* जिगर जितेश पटेल
* अजिथ विजयन
* सचिन पी प्रकाश
* मोहम्मद रिहान मोहम्मद तजमूल
* सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत
नक्की वाचा - Pune News पुण्यातील अल कायदाच्या संशयित दहशतवाद्याचे 'ठाणे कनेक्शन' उघड! 'गुप्त बैठकी'बाबत ATS चा मोठा खुलासा
देशभरात ३१ तक्रारी, ७ कोटी ८६ लाखांचे व्यवहार
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अटकेतील या संशयित आरोपींच्या नावावर देशभरात ३१ फसवणुकीच्या तक्रारी दाखल आहेत. याशिवाय, त्यांच्या बँक खात्यांवरून ७ कोटी ८६ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे या टोळीच्या व्यापक गुन्हेगारी नेटवर्कचा अंदाज येतो. सायबर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला मोठा ब्रेक लागला आहे. याबाबत अधिकचा तपास पिंपरी चिंचवड सायबर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उप निरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.