Kalyan Crime News Latest : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.सलमान डोलारे याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल असून गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. कल्याण पश्चिम येथील दुधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. धक्कादायक म्हणजे जेव्हा पोलिसांनी सलमान डोलारे यांच्या घरात प्रवेश केला,तेव्हा तो कुठेही सापडला नाही. पण एका पोलिसाची नजर एका कपाटावर गेली. त्या कपाटात सलमान लपून बसला होता.
त्यानंतर कल्याण क्राईम ब्रँच,बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कल्याण क्राईम ब्रँच युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने घरात प्रवेश करून सलमान डोलारे याला ताब्यात घेतले.पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि मोठ्या संख्येने नागरिक इमारतीखाली जमा झाले.परिस्थिती लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नक्की वाचा >> Jalna News: अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना अटक, छत्रपती संभाजीनगरात लावला होता ट्रॅप, 'ते' एक प्रकरण भोवलं
सलमान डोलारेविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल
सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे.आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या युसुफ हाइट्स,मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे.या दोन्ही इमारतींच्या फाईल देखील चोरी झाल्याची तक्रार महापालिकेकडून बाजारपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास देखील सुरू आहे.या प्रकरणात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात सलमान डोलारेविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> Pune News: संत तुकाराम-ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे वेळापत्रक जाहीर, पुण्यात कुठे-कुठे असणार मुक्काम?
या गुन्ह्यांचा तपास कल्याण क्राईम ब्रँच,ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक (एसआयटी)करत आहे.तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे,तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.काही अधिकारी देखील या प्रकरणाच्या चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे सलमान डोलारेच्या अटकेनंतर तपासाला गती मिळणार असून या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.