राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलाला हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस हवालदाराचं ते संतापजनक कृत्य पाहिल्यानंतर त्याला तातडीने निलंबित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात काम करीत होता. अनैतिक गोष्टींवर निर्बंध आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाने अशा प्रकारचं कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
लेडीज बारमध्ये पैसे उडवले...
नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे (पोहवा/१३२) यांचा कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर मांडोळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी निलंबनाचा आदेश जारी केला. अनैतिक प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असताना अशा आस्थापनेत उपस्थित राहणे हे शिस्तप्रिय पोलीस सेवेला न शोभणारे असल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी नवी मुंबईत गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
