जाहिरात

जेवणासाठी वहिनीला झोपेतचं संपवलं, 'ते' कृत्य लागलं जिव्हारी; पुण्यातील संतापजनक घटना 

जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दीराने झोपेत असलेल्या भावजयीला संपवलं.

जेवणासाठी वहिनीला झोपेतचं संपवलं, 'ते' कृत्य लागलं जिव्हारी; पुण्यातील संतापजनक घटना 
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दीराने झोपेत असलेल्या भावजयीच्या तोंडावर उशी दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मात्र दीर इथवर थांबला नाही तर त्याने वहिनी झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत भावजयीचा मृतदेह रुग्णालयातही नेला. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ही घटना 14 ऑगस्ट रोजी केशवनगर परिसरात घडली. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कविता नागराज गडदर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदर दाम्पत्य मूळचे कर्नाटकातले. मागील काही वर्षांपासून पुण्यातील केशवनगर परिसरात वास्तव्यास होते. आरोपी मल्लिकार्जुन हा भावाच्या घरी राहत होता. आरोपी काही कामधंदा करत नव्हता. शिवाय त्याला दारूचं व्यसन देखील होते. दारू पिण्यावरून आरोपी आणि मृत महिला यांच्यात यापूर्वी भांडणही झाले होते. दरम्यान घटनेच्या दिवशी आरोपीचा मोठा भाऊ मूळ गावी गेला होता. घरी आरोपी शरणाप्पा, कविता आणि त्यांची दोन मुले होते. त्यादिवशी आरोपी आणि कविता यांच्यात पुन्हा भांडण झाले. आरोपीने शिवीगाळ केल्याने कविता यांनी त्याच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने शरणाप्पा गडदरे याने कविताचा खून केला. 

नक्की वाचा - बीडमध्ये लाचखोरीच्या घटना वाढल्या, लाचलुचपत विभाग अलर्टवर, एकाच दिवसात दोन कारवाया!

कानाखाली मारल्यानंतर शरणाप्पा बाहेर गेला. काही वेळाने तो पुन्हा घरात आला. घरी आल्यानंतर तो कविता झोपण्याची वाट पाहू लागला. कविता आणि त्यांचा लहान मुलगा दोघे घरात झोपले होते. तर छोटी मुलगी घरात खेळत होती. आरोपीने या छोट्या मुलीला बाहेर खेळण्यासाठी पाठवलं आणि झोपेत असलेल्या कविता गडदरे हिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो घरात बसून राहिला. काही वेळानंतर त्याने कविता घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली असा बनाव रचत जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. मात्र तेथील डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले. तपासणीनंतर तिचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे उघड झाले आणि दीराचा प्रताप उघड झाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com