सूरज कसबे, प्रतिनिधी
पुणे शहरातील (Pune Bopdev Ghat) बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Pune Crime News) करून फरार झालेला तिन्ही आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यातील एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर, उर्वरित दोन आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्याच्या सासवड जवळील बोपदेव घाटाच्या परिसरात 3 ऑक्टोबरच्या रात्री 21 वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र रात्री 11 च्या सुमारास फिरण्यासाठी आले होते. त्याच वेळी दुचाकीवर आलेल्या या तीन आरोपींनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्यांची लूट केली. त्यानंतर तरुणीच्या मित्राला बेल्ट आणि शर्टने झाडाला बांधून मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले. पीडित तरुणी स्वतः ला सावरत तिच्या मित्राची सुटका केली. पीडित तरुणी एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राच्या फिर्यादीवरून कोंडवा पोलिसांत 4 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजता तक्रार नोंदविण्यात आली.
अशा प्रकारे सुरू केला पोलिसांनी फरार आरोपींचा शोध
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तब्बल 60 पथके नियुक्त केली होती. यात 700 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. त्यांनी या बोपदेव घाट परिसराजवळचे हॉटेल, पेट्रोल पंप आदी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेच तपासले होते. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूची चाळीसगावे, वाड्यावरही 450 गुन्हेगारांची चौकशी देखील केली होती.
नक्की वाचा - जॅकेट, हातात पांढरा रुमाल; अखेर आरोपीची ओळख पटली! बोपदेव प्रकरणात महत्त्वाची घडामोड
आरोपीचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर
पुणे पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून फरार आरोपींचे रेखाचित्र तयार केले होते. त्याआधारे तपास सुरू केला. आरोपीचे रेखाचित्र देखील तयार करण्यात आले. यासोबत सीसीटीव्ही फुटेजचा तपासात मोठा फायदा झाला. या प्रकरणातील सर्व आरोपी गुन्हेगार असल्याचे देखील समोर आले आहे. त्यांच्याविरोधात इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता. गुरुवारी दुपारनंतर आरोपींचे ठळक सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांना मिळाले. त्यानंतर हे फुटेज पीडित मुलीच्या मित्राला दाखवण्यात आले. त्याने यातील आरोपींना ओळखलं आणि त्यास तातडीने पुणे पोलिसांनी ताब्यातही घेतलं. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे ‘एआय'तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण करण्यात आले.
या प्रकरणातील आरोपी पुणेकर नाहीत, अखेर सिद्ध...
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांच्या तावडीतून कसा बचाव करायचा याची त्यांना माहिती होती. सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्य रस्ते चुकवत हे आरोपी फिरत होते. शेवटी गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढला. यातील एक आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित दोन आरोपींना नागपूर मधून ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अटकेत असलेला आरोपी मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी असून चार वर्षांपूर्वी तो पुणे शहरात उपजीविका भागवण्यासाठी आला होता. गेल्या चार वर्षापासून तो पुणे शहरातील उंड्री येथील कडनगर परिसरात राहतो. आरोपी हे पुणे शहरात मोलमजुरी करण्याचे काम करायचे. मध्य प्रदेशात त्यांच्यावर चोरी आणि लुटमारीचे गुन्हे देखील दाखल आहेत. पुण्याच्या बोपदेव घाट प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सामुदायिक सहकार्याने संशयित आरोपींना ओळखण्यात आणि पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेलीय.