Pune News : बुधवार पेठेत पोलिसांची धाड; ग्राहकांना दिली अशी वागणूक; एकाची मानवाधिकार आयोगात धाव

या प्रकरणात एका व्यक्तीने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली असून न्यायाची मागणी केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात होतं. बुधवार पेठेत कुणी अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय ढकललं जात नाही ना, कुणाला बळजबरीने शरीर विक्री करण्यास भाग पाडलं जात नाही ना याबाबत कडक तपासणी करण्यात आली होती. यावेळी पुणे पोलिसांचा ५० हून अधिक फौजफाटा असल्याची माहिती आहे. बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांकडून रात्रीच्या वेळी हे ऑपरेशन केलं जात असताना तेथील ग्राहकांना सार्वजनिकरित्या रस्त्यावर तासन् तास बसवून ठेवण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली असून न्यायाची मागणी केली आहे. 

बुधवार पेठेत आलेल्या ग्राहकांना रस्त्यातच बसवलं...

पुणे पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. या कारवाईत बुधवार पेठ परिसरातून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. याशिवाय या भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन संशयित  बांग्लादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आलं. मात्र या कारवाईदरम्यान उपस्थित ग्राहकांना रस्त्यावर बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप तुषार देविदास झेंडे पाटील यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, झेंडे पाटील म्हणाले की, अनेक ग्राहकांना कोणताही गुन्हा नसताना रस्त्यावर बसवून ठेवण्यात आलं. त्यांची सार्वजनिकपणे ओळख उघड होईल अशी वागणूक देण्यात आली. हे मानवी हक्काचं उल्लंघन असल्याचा दावा झेंडे पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

नक्की वाचा - Mumbai Pune Expressway : गॅस टँकर अपघातानंतर वसूल केलेला टोल परत मिळणार? कंपनीने काय सांगितलं?

कारवाईची मागणी...

झेंडे पाटील यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवावा आणि ऑपरेशनदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगबुक आणि नोंदी तपासून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली अशी मागणी मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. 

Topics mentioned in this article