Pune News : पुणे शहरात सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून गाड्यांमधून मोबाइल आणि मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या कुप्रसिद्ध टक-टक गँगचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडील पोलीस कर्मचारी मयूर भोसले, अमित जमदाडे आणि हेमंत पेरणे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी दोन संशयित इसमांचा शोध घेत असताना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित संशयित समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहेत.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लॉज परिसरात सापळा रचला. वर्णनाशी जुळणारे दोन संशयित इसम घटनास्थळी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रवी ओमप्रकाश कोहली (वय ३८) आणि अफजल कय्युम अब्बासी (वय ३८) अशी असून दोघेही मेरठ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. चौकशीत आरोपींनी पुणे शहरात अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींची कबुली...
अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कोथरूड येथील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून अॅपल कंपनीचा आयफोन १७ प्रो आणि पॉकेट चोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी विमाननगर चौकात एका कार चालकाला 'गाडी पायावरून गेली' असा बहाणा करून सॅमसंग आणि वनप्लस कंपनीचे मोबाईल चोरल्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात आरोपींनी फरासखाना, अलंकार आणि विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचं कबुल केलं असून पुढील कारवाईसाठी त्यांना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.