अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Bhor Crime News: साध्या पैशांच्या देवाणघेवाणीतून हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते, याचा धक्कादायक प्रत्यय पुण्याच्या भोर तालुक्यात आला आहे. एका ज्येष्ठ शेतकऱ्याला बोलण्यात गुंतवून, त्यांच्या डोळ्यादेखत हातचलाखी करत हजारोंची रोकड लंपास करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून, चोरट्यांनी वापरलेली शक्कल पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. नक्की काय घडलं आणि या चोरट्यांनी शेतकऱ्याला कसं फसवलं, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.
शेतातून घरी परतताना गाठले
भोर तालुक्यातील नसरापूर येथील तुकाराम रघुनाथ झोरे हे ज्येष्ठ शेतकरी त्यांच्या शेतातून काम आटोपून सांगवी माळेगाव रस्त्याने घराकडे परतत होते. पायदळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना वाटेत अडवले.
या व्यक्तींनी अतिशय सराईतपणे त्यांच्याशी संवाद साधला. शंभराच्या नोटा देतो, आम्हाला पाचशेची नोट द्या, असा बहाणा करून या चोरट्यांनी झोरे यांना बोलण्यात गुंतवले.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
काही क्षणातच 11 हजार रुपये गायब
संवादाच्या ओघात चोरट्यांनी झोरे यांना गोंधळात टाकले. काहीतरी भूल पडल्यासारखे झाल्याने झोरे यांना काही काळ काहीच सुचले नाही. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अतिशय शिताफीने हातचलाखी केली आणि झोरे यांच्या खिशातील 11000 रुपयांची रोकड काढून घेतली. काम फत्ते होताच दोन्ही चोरटे आपल्या दुचाकीवरून काही क्षणातच पसार झाले. चोरटे निघून गेल्यानंतर काही वेळाने झोरे यांना आपल्या खिशातील पैसे गायब असल्याचे लक्षात आले आणि त्यांना आपली फसवणूक झाल्याचे उमजले.
सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे चेहरे कैद
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुकाराम झोरे यांनी तातडीने राजगड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, त्यामध्ये या दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता आरोपींच्या शोधासाठी चक्रे फिरवली आहेत.
( नक्की वाचा : Pune News: खाकीची अरेरावी! साध्या विनंतीनंतरही पोलिसाचा संयम सुटला, भर रस्त्यात विद्यार्थ्याला बेदम मारहाण )
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत. दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीमधील पुराव्यांच्या आधारे लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रस्त्याने ये-जा करताना किंवा अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world