रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Ganesh Kale Murder : पुण्यात गँगवॉरने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गँग पुण्यात अस्तित्वात आहेत. पण आता त्या सक्रिय झाल्या आहेत. विरुद्ध टोळीचा बदला घेण्यासाठी हत्या करीत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकात दुपारी ३:४५ च्या सुमारास घडली. येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ४ जण दोन दुचाकीवर आले आणि त्यांनी जवळपास ९ गोळ्या झाडल्या. त्यातल्या २ गोळ्या त्या व्यक्तीला लागल्या. एवढच नाही तर त्या आरोपींनी कोयत्याने पण वार केला. ज्याने त्या रिक्षामध्ये बसलेल्या माणसाचा जागीच मृत्यू झाला.
गणेश काळेची हत्या का केली?
या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. त्यानंतर गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे. ज्याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशहून १० पिस्तुल पुरवल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. गणेश काळेची निर्घून हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली आणि हत्या करताना वापरलेल्या दोन पैकी एक गाडी जप्त करण्यात आली. अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण चार आरोपी अटकेत आहेत. अद्याप हे स्पष्ट झालेल नाही की हे आरोपी कुठल्या टोळीशी सबंधित आहेत, कधी पासून हा कट रचला जात होता, आणि कोण आहे या मागचा सूत्रधार.
नक्की वाचा - Pune Accident CCTV Footage: कारचे तुकडे, 2 सेकंदात दोघांचा मृत्यू, पुण्यातील भीषण अपघाताचा VIDEO
तर या सगळ्या बाबत मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पण सांगितलं आहे. पण शेवटी प्रश्न आहे की अनेक छोट्या मोठ्या टोळ्या या सक्रिय झाल्या आहेत आणि एकमेकांचा बदला घेण्यासाठी शस्त्र पुरवणे किंवा लहान मुलांचा समावेश करून घेणं यामुळे पुण्याची तरुणाई कुठल्या दिशेने जातेय? असा सवाल उपस्थित होतोय. पोलिसांचा वचक कमी पडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सद्यस्थितीत मोठ्या टोळ्यांचे म्होरके जेलमध्ये असूनही असे प्रकार घडत आहेत. टोळीप्रमुख किंवा टोळीतले मुख्य गुंड गजाआड असूनही अशा घटना होत असतील तर पुण्याची सुरक्षा धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
काळे हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट
कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरणात गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींना कोंढवा पोलीस कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
