- पुण्यातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातच बाळाला जन्म दिला असून नाळ स्वतःच कापली
- या घटनेची माहिती मुलीच्या मोठ्या बहिणीने दिली असून आदिल फारुख शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद
Pune News: पुण्यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ 15 वर्षीय मुलीने घरामध्येच बाळाला जन्म देऊन स्वतःच नाळ कापल्याची हादरवणारी घटना समोर आलीय. सध्या या मुलीसह तिच्या बाळावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित मुलीच्या मोठ्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली होती, त्यानुसार आदिल फारुख शेख (वय 24 वर्ष) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटलं गेलंय.
घराच्या खिडकीवर आढळलं नवजात बाळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह झालेला आहे, 31 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्या माहेरी आल्या होत्या. पण घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना आढळलं. थोड्या वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यानंतर लहान बहिणीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच फरशीवर तसेच दरवाजाजवळ रक्ताचे डाग आढळले. घरामध्ये रक्त पाहून ही मंडळी हादरली होती. धक्कादायक बाब म्हणजे घरातील खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले दिसल्याने त्यांना अधिकच धक्का बसला.
(नक्की वाचा: VIDEO: पत्नी-मुलीचा विरह ठरला जीवघेणा! तरुणानं पिंपरी चिंचवडच्या मंडईत फेसबुक लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल)
अल्पवयीन मुलीनं स्वतःच कापली बाळाची नाळ
याबाबत लहान बहिणीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने घरातच डिलिव्हरी झाल्याचे सांगितले. इतकंच नव्हे तर बाळाची नाळ देखील स्वतःच कापल्याचं तिने सांगितलं. आई आणि आत्या घरी आल्यानंतर मुलीने मागील वर्षाभरापासून आदिल शेख याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. या काळात दोन ते तीन वेळा शरीरसंबंध झाल्याचेही तिने नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटलं गेलंय. दरम्यान कुटुंबीयांनी तातडीने मुलीला आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडालीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world