अजिंक्य पाटील, प्रतिनिधी
Pune News : पुणे शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका ५५ वर्षीय महाविद्यालयीन प्राचार्यांना गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत लुबाडण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांचं रक्षण करण्याचं वचन घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही हे घृणास्पद कृत्य केल्यानं पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राचार्यांना एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीपोटी प्राचार्यांनी टप्प्याटप्प्याने आरोपींना सुमारे ७ लाख रुपये दिले. मात्र, हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात प्राथमिक चौकशीअंती खालील तिघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये अजित बडे (पोलीस उपनिरीक्षक), सोनाली हिंगे (दामिनी मार्शल), सुदाम तायडे (पोलीस कर्मचारी) यांच्या नावाचा समावेश आहे.
पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह...
घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. अधिक तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरिकांमध्येही संतापाची लाट असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे