अजिंक्य पाटील, प्रतिनिधी
Pune News : पुण्याच्या भोर तालुक्यातील जांभळी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ७५ वर्षांच्या वृद्धाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. किसन सुर्वे असं मृत व्यक्तीचं नाव असून जावयाच्या हॉटेलमध्ये किसन सुर्वे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करीत हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
75 वर्षांचे किसन सुर्वे पुण्यातील भोर तालुक्यातील जांभळी येथे जावयाचं हॉटेल चालवित होते. दरम्यान जावयाच्या हॉटेलमधील एका आचाऱ्याने किरकोळ कारणावरुन किसन सुर्वे यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. भोरमधील राजगड पोलिसांनी अवघ्या ६ तासांत या खून प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी दोन विशेष पथके तपासासाठी तत्काळ रवाना करून अचूक सापळा रचत आरोपीला अटक केली. हा आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुण्यातील कात्रज चौकातून ताब्यात घेण्यात आलं.
किरकोळ वादातून हत्या
सागर लक्ष्मण कुमार राणा असं 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे. सागर हा त्याचं हॉटेलमध्ये काम करीत होता. आरोपीची चौकशी केली असता पोलिसांना हत्येचं धक्कादायक कारण कळालं. सागर हा काम सोडून मोबाइल पाहात असल्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या किरकोळ कारणावरुन सागरने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान भोरचे राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world