- अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबाने अंगात देवी शक्ती असल्याचे भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित महिलेकडून तब्बल 50 लाख रुपये देखील उकळले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी औदुंबर मनोहर गडदे याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक वादामुळे काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या याच मानसिक परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा आरोपी औदुंबर गडदे याने घेतला. आपण 'देवऋषी' असून आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे त्याने महिलेला पटवून दिले.
लॉजवर नेऊन अत्याचार
आरोपीने पीडितेवर विश्वास संपादन केल्यानंतर तिला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावले. तिथे तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने तिला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नेले आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Ulhasnagar News : लाखो रुपये घेतले, घरकाम- स्वयंपाक करवून घेतला; उल्हासनगरमध्ये CBI नोकरीसाठी काय सुरू होतं?)
महिलेला 50 लाख रुपयांचा गंडाअत्याचारासोबतच आरोपीने पीडितेला 50 लाख रुपयांना गंडा देखील घातला. फसवणूक आणि अत्याचार झाल्याचे लक्षात येताच महिलेने धाडस करून पोलिसांत धाव घेतली.
पोलीस कारवाई
स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी आरोपी औदुंबर मनोहर गडदे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पुणे पोलिसांचे एक पथक त्याचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.