जाहिरात

Ulhasnagar News : लाखो रुपये घेतले, घरकाम- स्वयंपाक करवून घेतला; उल्हासनगरमध्ये CBI नोकरीसाठी काय सुरू होतं?

सीबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Ulhasnagar News : लाखो रुपये घेतले, घरकाम- स्वयंपाक करवून घेतला; उल्हासनगरमध्ये CBI नोकरीसाठी काय सुरू होतं?
AI Image

Ulhasnagar News : सीबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजू पट्टेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर महिलांकडून घरकाम करून घेतल्याचेही गंभीर आरोप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू पट्टेकर हा स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचं भासवून लोकांना सीबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत होता. यासाठी तो प्रत्येकीकडून दीड लाख ते चार लाख रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलांची संख्या अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

नक्की वाचा - Pune News :प्राध्यापकाने स्टँम्प पेपरवर लिहिलं मात्र केलं भयंकर; पुण्यात Phd च्या विद्यार्थिनीचा दुर्देवी शेवट

आरोपीने महिलांकडून घरकाम करून घेतलं...

मात्र, पैसे घेतल्यानंतर ना नोकरी दिली जात होती, ना पैसे परत केले जात होते. पैसे परत मिळवण्यासाठी काही महिला आरोपीच्या घरी जात असत. तेव्हा आरोपी त्यांना आपल्या मुलांची देखभाल करण्यास भाग पाडत असे, तसेच चहा आणि जेवण बनवण्यासही लावत असे. तरीदेखील तो पैसे परत करत नव्हता. या प्रकाराला कंटाळून उल्हासनगरमधील काही महिलांनी एकत्र येत आरोपीला बोलावून घेतले आणि त्याला चोप देत विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुरुवातीला तक्रार नसल्याचे कारण देत विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचंही समोर आलं. मात्र, नंतर या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गंभीर दखल घेतली. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी राजू पट्टेकर या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी राजू पट्टेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने किती जणांना फसवले आहे याचा सखोल तपास पोलीस करत असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com